आयपीएलच्या सहाव्या पर्वाने कुशल नेतृत्वाची आणखी एक ओळख रोहित शर्माला मिळवून दिली. महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच मैदानावर ‘कॅप्टन कुल’ ही प्रतिमा जपणाऱ्या रोहितने मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट संघात स्थान पक्के असणाऱ्या रोहितचा कसोटी क्रिकेटवर दृढ विश्वास आहे. ‘सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा यशस्वी कसोटीपटू होण्याचे स्वप्न मी जोपासले आहे. कारण कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूच्या कामगिरीचा खरा कस लागतो,’ असे मत रोहितने या वेळी प्रकट केले आहे. रोहितची सध्याची कामगिरी, नेतृत्व, कारकीर्द आणि आगामी वाटचालीविषयी आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी ‘लोकसत्ता’शी केलेली खास बातचीत-
 तुझ्याकडे कर्णधारपद आल्यापासून मुंबई इंडियन्सचे नशीब पालटले आहे. तुझे यावर काय मत आहे?
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील बलाढय़ संघ आहे. जागतिक क्रिकेटमधील काही दिग्गज खेळाडू या संघात आहेत. अशा संघाचे नेतृत्व करायला मिळणे, हा मी माझा सन्मान समजतो. संघातील माझे महत्त्व काय आहे, याचा मी फार विचार करीत नाही. आम्ही सर्वानी योगदान दिल्यामुळेच मुंबईला ही मजल मारता आली आहे. कर्णधारपदाचा मी जबाबदारीने आनंद लुटतो. माझ्या संघातील सहकारी आणि साहाय्यक यांचे म्हणणे ऐकून घेतो आणि मगच निर्णय घेतो. मुंबईच्या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. मी या प्रत्येकाच्या सल्ल्याचा आदर करतो.
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागील वर्षभराच्या तुझ्या कामगिरीबाबत तू काय सांगशील?
वर्षभर मी अनेक चढ-उतार पाहिले. मी अतिशय मेहनत घेतली. प्रत्येकदा त्याचे चीज झाले नाही. परंतु तिथेच अडकून पडण्याऐवजी मी नेहमी भविष्याकडे पाहतो आणि मार्गक्रमण करतो.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तुझी कामगिरी आणि कर्णधारपद दोन्ही यशस्वी ठरले. याविषयी तुला काय वाटते?
होय, मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली आणि कर्णधारपदाचाही आनंद लुटला, ते तुम्ही पाहिलेच. जबाबदारी सांभाळायला मला नेहमी आवडते. माझ्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत रुबाबात मजल मारली, ही भावनाच अत्यंत सुखावणारी आहे आणि याचा मला अभिमान आहे.रोहितकडे जन्मजातच नेतृत्वाचे गुण आहेत, असे मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्स काही दिवसांपूर्वी म्हणाले. संघात अनेक अनुभवी खेळाडू असतानाही रिकी पाँटिंगला वगळल्यानंतर कर्णधारपद थेट तुझ्याकडे आले.
नेतृत्व सांभाळण्यासाठीचे तुझ्यात असे काय विशेष गुण आहेत?

जॉन्टीचे कौतुक नक्कीच आत्मविश्वास वाढविणारे आहे. मैदानावर मी अतिशय शांत आणि संयमी असतो. समस्यांनी तणाव वाढविण्यापेक्षा मार्ग काढण्याकडे माझा प्रकर्षांने कल असतो. मैदानावर तुम्ही व्यथित असाल तर तुमच्या निर्णयावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीवर माझा भरवसा आहे. याचप्रमाणे संघाला मी प्रेरित करीत राहतो. माझ्या खेळाडूंच्या पाठीशी मी कर्णधार म्हणून असायला हवे, यावर माझा विश्वास आहे. एक कर्णधार म्हणून तुमच्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी तुम्ही महत्त्व द्यायचे असते आणि त्यासाठीच मी प्रयत्नशील असतो.
क्रिकेटला तू कसा सामोरा जातोस? तू ध्येयनिश्चिती करतोस की गोष्टी जशा समोर येतील, तशा प्रकारे त्यांना सामोरा जातोस?
माझी तंदुरुस्ती आणि मानसिक सामथ्र्य या गोष्टींना मी खूप महत्त्व देतो. सराव करतानाही माझी बलस्थाने आणि उणिवा यांचा काटेकोरपणे अभ्यास करतो. मैदानावर मी जेव्हा पाऊल ठेवतो, तेव्हा मी माझे सर्वस्व पणाला लावून कामगिरी करतो. समोर येणाऱ्या प्रत्येक सामन्याचा मी विचार करतो. सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा यशस्वी कसोटीपटू होणे, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूच्या कामगिरीचा खरा कस लागतो आणि हेच या प्रकाराचे आदरस्थान आहे, असे मला वाटते.
अनिल कुंबळे, जॉन राइट, जॉन्टी ऱ्होड्स, रॉबिन सिंग ही क्रिकेटमधील मोठी नावे मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्याकडून वैयक्तिकपणे तू कोणते धडे घेतलेस?
या सर्व महान खेळाडूंकडे ज्ञानाचे भांडार आहे. त्यांच्यासोबत घालविलेल्या वेळातून मला खूप काही मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची मला खूप मदत झाली आहे. त्यांच्याकडून जितके शक्य होईल, तितके शिकण्याचा माझा कल असतो.
इंग्लंडला होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी तू काय योजना आखली आहेस?
मी जे करीत आलो आहे, तेच करीत राहणार आहे. माझा खेळ आणि तंदुरुस्ती यावर मी सर्वतोपरी मेहनत घेत आहे. चॅम्पियन्स करंडक ही क्रिकेटविश्वातील फार मोठी स्पर्धा आहे आणि माझ्या कामगिरीचा अभिमानास्पद ठसा उमटविण्यासाठी मी उत्सुक आहे. एक संघ म्हणून भारतीय संघ अतिशय बलवान आहे आणि आम्ही जेतेपदाचे दावेदार मानले जात आहोत.
सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, आदी अनेक मोठय़ा खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे. या खेळाडूंनी तुझ्या कारकिर्दीला काय दिले आहे?
मी माझ्या वरिष्ठ खेळाडूंचा आदर करतो. जागतिक क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मी नेहमीच घेत असतो. माझ्या फलंदाजीत सचिनने मला खूप मदत केली आहे. धोनीसोबत खूप खेळायची संधी मिळाल्यामुळे कठीण परिस्थितीला शांतचित्ताने सामोरे जाण्याचे धडे मला मिळाले.
जीवनात नशिबाला किती महत्त्व असते असे तुला वाटते?
मी थोडय़ाफार प्रमाणात नशिबाला मानतो. परंतु तुम्ही जी मेहनत घेता, तेव्हा त्याचे फळ तुम्हाला निश्चितपणे मिळते. नुसती इच्छा असून उपयोग नसतो, यावर माझा खूप विश्वास आहे. फक्त काही वेळा तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागते.
तुझे कुटुंब आणि प्रशिक्षक यांचे तुझ्या कारकिर्दीला काय योगदान आहे?
मी जे काही मिळवले आहे, त्यात माझ्या कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे पाठबळ मिळाले नसते, तर मी इथवर पोहोचूच शकलो नसतो. याचप्रमाणे माझे प्रशिक्षक दिनेश लाड यांनीच माझी गुणवत्ता सर्वप्रथम हेरली आणि माझ्यातील कौशल्य विकसित केले.
एक क्रिकेटपटू म्हणून कोणते लक्ष्य गाठण्याचे ध्येय तू स्वत:समोर ठेवले आहेस?
मला शक्य होईल ते सर्व काही!