‘बंगाल टायगर’ सौरव गांगुलीची कर्णधार म्हणून कारकीर्द यशस्वी ठरली. १९९९ च्या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू मॅच फिक्सिंगच्या वादात अडकले. त्यानंतर नव्या भारतीय संघाची बांधणी करण्याची जबाबदारी सौरव गांगुलीवर होती. त्याने २००० सालानंतर नव्या दमाच्या खेळाडूंना सोबत घेऊन नवी टीम इंडिया उभी केली. सचिन तेंडुलकरने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडलं तेव्हा गांगुली कर्णधार झाला, पण सचिननंतर त्या पदासाठी गांगुलीला पहिला पसंती नव्हती, अशी माहिती तत्कालीन निवड समिती सदस्य आणि भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सांगितले.
“सौरव गांगुली कर्णधार होईल असं आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं, कारण तेव्हा सचिन कर्णधार होता. पण थोड्या कालावधीतच त्याने राजीनामा दिला. त्यावेळी इतरांच्या मनात गांगुली हा पहिली पसंती नव्हती. आम्हाला गांगुली पदासाठी कसा योग्य आहे हे साऱ्यांना समजवावं लागलं होतं. कारण त्यावेळी अजय जाडेजा आणि अनिल कुंबळे हे दोघे कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. पण आम्ही कसंबसं BCCIच्या उच्चपदस्थांना समजावलं आणि ओव्हरटाइम करून अखेर गांगुलीला कर्णधारपद दिलं”, असा रोमांचक किस्सा मल्होत्रा यांनी स्पोर्ट्सकीडाशी बोलताना सांगितला.
गांगुलीला उपकर्धार बनवण्यासाठीदेखील आम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागले होते. प्रशिक्षकाच्या गांगुलीबद्दल तक्रारी होत्या की तो खूप कोल्ड ड्रिंक पितो, दुहेरी धावा घेत नाही वगैरे…तरीही निवड समितीत गांगुली ३-२ अशा मताधिक्याने उपकर्णधार बनला होता. पण BCCIचे एक उच्चपदस्थ अधिकारी आले आणि त्याने या निर्णयाबाबत नाराजी दर्शवली. त्यांच्या नाराजीनंतर आमच्यातील एकाने पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे तेव्हा त्याला उपकर्णधार बनवता आले नाही, पण नंतर मात्र त्याला आम्ही उपकर्णधार आणि कर्णधारही बनवलं”, असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 12:55 pm