केवळ वेगवान व भेदक गोलंदाज असून उपयोग नाही. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वर्चस्व गाजविण्यासाठी येथील वातावरणाशी व खेळपट्टय़ांशी अनुरूप होणे जरुरीचे आहे, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रभारी मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह रिक्सन यांनी सांगितले.
रिक्सन यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलियाचे आठ खेळाडू येथील वातावरणाशी जुळवून घेण्याकरिता मालिकेपूर्वी अगोदरच येथे आले आहेत. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेस २२ फेब्रुवारीस प्रारंभ होत आहे.
भारतामधील खेळपट्टय़ा सर्वसाधारणपणे फिरकी गोलंदाजीस अनुकूल असतात. या खेळपट्टय़ांवर भारताचे खेळाडू निर्विवाद वर्चस्व गाजवितात. त्यामुळेच त्यांना कडवी लढत द्यायची असेल, तर आम्हाला या खेळपट्टय़ांचा भरपूर सराव करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच आम्ही येथे अगोदर आलो आहोत. आमचे खेळाडू फिरकी गोलंदाजीस घाबरत नाहीत. आमच्या खेळाडूंनी श्रीलंकेतील खेळपट्टय़ांवर चांगली कामगिरी केली आहे. तेथील काही खेळपट्टय़ा खूपच खराब होत्या. येथील खेळपट्टय़ा त्यासारख्या नाहीत. भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची क्षमता आमच्या खेळाडूंमध्ये आहे. येथील खेळपट्टय़ा कसोटी सामन्याचे पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजीस साथ देतात व शेवटचे तीन दिवस फिरकीस साथ देतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे.