हॉकी इंडिया लीग
केवळ एकच पराभव स्वीकारणारा दिल्ली व्हेवरायडर्स, तर त्यांना पहिल्या पराभवाचा धक्का देणारा उत्तर प्रदेश विझार्ड्स हे हॉकी इंडिया लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अव्वल दर्जाची कामगिरी करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. रांचीत शनिवारी उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे.
उपांत्य फेरीच्या लढतीत दिल्लीला पंजाब वॉरियर्सशी खेळावे लागणार आहे, तर उत्तर प्रदेश विझार्ड्सला रांची ऱ्हिनोज संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दिल्ली संघाने या स्पर्धेतील साखळीतील बारा सामन्यांपैकी नऊ सामने जिंकताना अव्वल दर्जाचा खेळ केला आहे. दोन सामन्यांमध्ये त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली होती तर केवळ एकच सामना त्यांनी गमावला आहे. आक्रमक फळीतील सुरेख सांघिक समन्वयाबरोबरच दिल्लीच्या खेळाडूंनी भक्कम बचावाचा प्रत्यय घडविला आहे. पंजाब वॉरियर्सने साखळी गटातील बारा सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला होता. त्यामुळेच उपांत्य लढतीत त्यांच्यापेक्षा दिल्लीची बाजू वरचढ मानली जात आहे.
दिल्ली संघास पराभवाचा धक्का दिल्यामुळे उत्तर प्रदेश संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तरीही रांची ऱ्हिनोजविरुद्ध विजय मिळविणे हे त्यांच्यासाठी आव्हानात्मकच आहे. उत्तर प्रदेश व रांची यांच्यात सायंकाळी पाच वाजता सामना होईल व त्यानंतर दिल्ली व पंजाब हा सामना होणार आहे.