श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चौथा एकदिवसीय सामना शनिवारी खेळवण्यात येणार आहे. पहिले दोन सामने गमावल्यावर श्रीलंकेने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले होते. चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची त्यांच्यासाठी नामी संधी असेल; पण हा सामना गमावल्यास त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

ही खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे श्रीलंकेला विजयाची अधिक संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. न्यूझीलंडसाठीदेखील हा सामना महत्त्वाचा असेल. हा सामना जिंकून त्यांना मालिकेत विजयी आघाडी घेता येऊ शकेल, पण त्यांना वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या रूपात धक्का बसला आहे. डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे साऊथी या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी मॅट हेन्रीला संधी देण्यात आले आहे. संघातील इश सोधी आणि मिचेल सँटर यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही.

तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचे २७६ धावांचे आव्हान फक्त दोन फलंदाज गमावत सहजपणे पूर्ण केले होते. या सामन्यात सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने दमदार खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. गेल्या सामन्यात लहिरू थिरीमाने आणि दमुश्का गुनथिलका यांनीही चांगली फलंदाजी केली होती. गेल्या सामन्यासारखी दमदार फलंदाजी करून श्रीलंका मालिकेत बरोबरी करते की न्यूझीलंडचा संघ विजयी आघाडी घेतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.