टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आधीच पदकनिश्चिती करणाऱ्या बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहाइनला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बुधवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटात टर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेलीने लवलिनाला धूळ चारून अंतिम फेरी गाठली.

जगज्जेत्या बुसेनाझने आसामच्या २३ वर्षीय लवलिनाचा उपांत्य लढतीत ५-० असा फडशा पाडला. परंतु बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक बहाल करण्यात येते. त्यामुळे लवलिनाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात दुसरे कांस्य आणि एकूण तिसऱ्या पदकाची नोंद केली. बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी ती भारताची तिसरी खेळाडू ठरली. शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत बुसेनाझसमोर चीनच्या गू हाँगचे आव्हान असेल.

२०१९मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या लवलिनावर बुसेनाझने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. पहिल्या फेरीत पाचही पंचांनी बुसेनाझच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत बुसेनाझने अधिक आक्रमक रूप धारण केले. लवलिनानेही अधूनमधून जोरदार ठोसे लगावले. तिसऱ्या फेरीत तिची देहबोली थकलेली जाणवली. याचा लाभ उचलत बुसेनाझने एकंदर उत्तम कामगिरीच्या बळावर तिन्ही फेऱ्यांमध्ये पंचांचा कौल मिळवला.

लवलिनाच्या कांस्यपदकासह भारताचे बॉक्सिंगमधील अभियान समाप्त झाले. महिलांमध्ये मेरी कोम, पूजा राणी यांचा उपांत्यपूर्व, तर सिमरनजीत कौरचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. पुरुषांमध्ये फक्त सतीश कुमारने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाटचाल केली. मनीष कौशिक, विकास क्रिशन, अमित पांघल आणि आशीष कुमार यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

गेल्या आठ वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाल्यामुळे मी आनंदित आहे. परंतु आज मी फारच सुमार कामगिरी केली. बुसेनाझने अपेक्षेपेक्षा अधिक आक्रमक खेळ केल्याने मला बचावावर भर द्यावा लागला. पदकाचा रंग सोनेरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे मी निराश आहे.

– लवलिना बोर्गोहाइन

वर्ष        स्थान    मल्ल           पदक

२००८   बीजिंग  विजेंदर सिंग     कांस्य

२०१२  लंडन     मेरी कोम         कांस्य