भारताची लव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. ६४-६९ किलोग्राम वजन गटात तिने जर्मन बॉक्सरला ३-२ ने पराभूत केले. लव्हलिना ही पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. एकदा उपांत्य फेरी गाठल्यानंतर तीचे कांस्यपदक निश्चित होईल. उपांत्यपूर्व सामना ३० जुलै रोजी होईल.

लव्हलिनाने संपूर्ण सामन्यात तिच्यापेक्षा अधिक अनुभवी बॉक्सरशी स्पर्धा केली आणि अखेर हा सामना जिंकण्यात ती यशस्वी झाली. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये लव्हलिनाने शानदार खेळी केली पण तिसर्‍या फेरीत जर्मन बॉक्सरने पुनरागमन केले. पण शेवटी भारताच्या बॉक्सर लव्हलिनने बाजी मारली. भारतीय महिला बॉक्सर लव्हलिनाची ही पहिली ऑलिम्पिक आहे. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक सामन्यात भारतीय बॉक्सरने चमकदार कामगिरी करून पदकाची आशा निर्माण केली आहे.

बॉक्सर लव्हलिनाशिवाय, बॉक्सिंगसाठी भारताची पदकांची आशा असलेल्या एमसी मेरी कोमनेही विजयासह टोकियोमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मेरी कोमने हर्नांडेझ गार्सियाविरुद्ध ३२ सामन्यांची फेरी जिंकून पदकाच्या आशा निर्माण केल्या आहेत.