तमिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला. तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या एकमेव खेळाडूने एकेरी महिला गटात विजयी सुरुवात केली आहे. मात्र दुर्दैवाने पुढील सामना गमावल्याने भवानी देवीचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. यानंतर भवानीने ट्वीट करत लोकांची माफी मागितली. ”मी माझ्या परीने प्रयत्न केले पण दुसरा सामना जिंकू शकले नाही. मी माफी मागते. तुमच्या प्रार्थनांसह मी पुढील ऑलिम्पिकमध्ये आणखी चांगली कामगिरी करेन”, असे भवानीने ट्वीट करत म्हटले होते.

भवानीच्या या ट्वीटवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली. भवानीचे ट्वीट रिट्वीट करताना मोदी म्हणाले, ”तुम्ही उत्तम प्रयत्न केले आणि तेच महत्त्वाचे आहे. पराभव आणि विजय हा जीवनाचा एक भाग आहे. तुमच्या योगदानाचा भारताला अभिमान आहे. आपण आमच्या नागरिकांसाठी प्रेरणा आहात.”

 

भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने पराभव करत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विजयारंभ केला. तिने फक्त सहा मिनिटे १४ सेकंदांमध्ये सामना जिंकत प्रथमच ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत यश मिळवून दिले. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली होती.

हेही वाचा – वय फक्त आकडाच..! ४१ वर्षीय शाहिद आफ्रिदी आता ‘या’ टी-२० लीगमध्ये घालणार धुमशान

मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या फ्रान्सच्या मॅनॉन ब्रुनेटविरोधातील सामन्यात भवानी देवीचा पराभव झाला. भवानीला मॅनॉन ब्रुनेटविरुद्ध ७-१५ अशी मातल खावी लागली.