भारतीय महिला बॉक्सर पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली आहे. भारताकडून ७५ किलो वजनी गटात पूजा राणीचा ऑलिम्पिकचा प्रवास संपला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पूजा राणीला चीनच्या खेळाडूने ५-० ने पराभूत केले. हा सामना एकतर्फी झाला. तिन्ही फेऱ्यांमध्ये चिनी खेळाडू ली कियानने वर्चस्व गाजवले. याआधी पूजा राणीने पहिल्याच फेरीत अल्जेरियाच्या चाईब इचार्कचा पराभव केला होता. पाच पंचांनी पूजाला १० पैकी १० गुण दिले होते. इचार्कला हरवल्यामुळे पूजा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली होती.

मेरीच्या पराभवानंतर महिलांच्या विभागात आता पूजा राणी, लव्हलिना बोर्गोहेन आणि सिमरनजीत कौर यांच्यावर भारताच्या आशा टिकून होत्या. यांपैकी पूजा आणि लव्हलिना यांनी उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले होते. लव्हलिनाने उपांत्यपूर्व फेरी पार करत उपांत्य फेरी गाठली आहे. तर थायलंडच्या सुदापोर्न सीसाँडीकडून पराभवामुळे सिमरनजित कौरचे ६० किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आव्हान संपुष्टात आले. सिमरनजितने ०-५ अशी हार पत्करली. मात्र पूजा राणीला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली.

हात भाजल्यानंतर दोन वर्षे बॉक्सिंगपासून होती दूर

२०१६ मध्ये दिवाळीच्या वेळी पूजाचा हात भाजला गेला होता, त्यानंतर वाटले होते की पूजा आता बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार नाही. ती दोन वर्षे रिंगपासून दूर राहिली, मात्र नंतर ती परतली आणि पूजाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी पदके जिंकली.

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा जिंकले सुवर्ण

पूजा राणीने २०१९ आणि २०२१ मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. २०१५ मध्ये, या चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि २०२१ मध्ये रौप्य पदक मिळवले. याशिवाय ती २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेती आहे.