भारताच्या नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने ८७.५८ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. नीरज व्यतिरिक्त आणखी एक खेळाडू ज्यावर भारतीयांची नजर होती, तो म्हणजे पाकिस्तानचा अर्शद नदीम. नदीम एकही पदक जिंकू शकला नसला, तरी त्याच्या कामगिरीची प्रशंसा करण्यात आली.

नदीमने अंतिम फेरी गाठली. त्याने पाचवे स्थान मिळवले. नदीमने अनेक प्रसंगी नीरजचे प्रेरणास्थान म्हणून वर्णन केले आहे. तो नीरजच्या खेळाचा चाहता आहे आणि हे त्याच्या बोलण्यातूनही स्पष्ट होते. त्याचबरोबर, नीरजही नदीमच्या कामगिरीवर खूश आहे आणि नदीमपासून प्रेरणा घेऊन आणखी लोक पाकिस्तानात भालाफेककडे आकर्षित होतील अशी त्याला आशा आहे.

आणखी वाचा : ‘तुझी गर्लफ्रेंड आहे का?’, सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला…

नीरजने ऑलिम्पिकचा किस्सा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे. तो म्हणाला, ”मी फायनल सुरू होण्यापूर्वी माझा भाला शोधत होतो. मला तो मिळत नव्हता. अचानक मला अर्शद नदीम माझा भाला घेऊन चालताना दिसला. मी त्याला म्हणालो, ”भाऊ हा माझा भाला आहे, मला दे. मला आता तो फेकायचा आहे. मग त्याने तो मला परत दिला. तेव्हाच तुमच्या लक्षात आले असेल की मी माझा पहिला थ्रो घाईत केला.”

अर्शद नदीम अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्सच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. नीरज म्हणाला, ”नदीमने पात्रता फेरीत खूप चांगली कामगिरी केली आणि अंतिम फेरीतही तो चांगला खेळला. भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकतो.”