टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी करत भारताच्या झोळीत अजून एक पदक ठेवले. एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकल्यानंतर पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची आशा भारताला होती. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर रवीने देशवासियांचे आभार मानले आहेत.

रवी म्हणाला, ”माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या देशवासियांचे, माझ्या प्रशिक्षकांचे आणि पाठिंबा देणाऱ्या महासंघाचे मला आभार मानायचे आहेत. मी आनंदी आहे, पण समाधानी नाही, कारण मी सुवर्णपदकाचे ध्येय ठेवले होते. मी देशाला अभिमान वाटेल अशी अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.”

 

हेही वाचा – करोनातून सावरल्यानंतर मायदेशी परतला टीम इंडियाचा ‘स्टार’ क्रिकेटपटू

फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. मात्र असे असले तरी रवीने केलेली कामगिरी ही ऐतिहासिक ठरली असून आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे.

रवीवर बक्षिसांचा वर्षाव

रवीने ऑलिम्पिक पदक जिंकावे म्हणून त्याच्या गावातील लोकही देव पाण्यात ठेऊन बसले होते. रवीच्या या रौप्यपदकामुळे गावाचेही नशीब पालटणार आहे. ४ कोटी रुपये, नोकरी, गावात स्टेडियम आणि राज्यात कुठेही रवीच्या इच्छेप्रमाणे तो सांगेल त्या भागात ५० टक्के सवलतीमध्ये जमीन असा बक्षिसांचा पाऊसच हरयाणा सरकारने आपल्या या सुपुत्रावर पाडला आहे.