चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे आणिबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्राणघातक विषाणूने आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी घेतला आहे, या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोना व्हायरचा फटका आता जपानमधील टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेलाही बसण्याची शक्यता आहे. कोरोनावर योग्य वेळेत नियंत्रण आलं नाही तर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी लागेल अशी भीती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या एका सदस्याने बोलून दाखवली आहे.

काही दिवसांपूर्वी जपानमध्येही एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून…स्थानिक प्रशासनाने फुटबॉल स्पर्धा रद्द केली. २४ जुलैपासून टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र तोपर्यंत या व्हायरवर नियंत्रण आलं नाही, तर स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी हलवणं शक्य नसल्यामुळे स्पर्धा रद्द केली जाऊ शकते. कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी जपान सरकारला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी अधिक सुरक्षा, जेवण्या-खाण्याच्या पदार्थांचं योग्य परिक्षण, खेळाडूंच्या राहण्यासाठीच्या व्यवस्थेची सुरक्षा…या सर्व गोष्टींवर अधिक भर द्यावा लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी जपानच्या चिबा भागात कोरोनाचा एक रुग्ण आढळला. या ठिकाणी ऑलिम्पिकचे त्वायकांडो, तलवारबाजी आणि कुस्तीच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे जपानमधील आरोग्य यंत्रणांना अधिक दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून जपामधील सर्व स्थानिक क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत. जपानमधील काही महत्वाच्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या काळात घरातून काम करण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे आगामी काळाय यासंदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.