भारतीय महिला हॉकी संघांची टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. ‘अ’ गटातील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. जर्मनीने भारताला २-० ने पराभूत केलं. जर्मनीला १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर निकी लॉरेंसने या संधीचं सोनं करत गोल झळकावला. सामन्यात १-० ने आघाडी घेत भारतावर दबाव निर्माण केला. निकीनं टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेतील पहिला गोल केला. त्यानंतर जर्मनीने ३५ व्या मिनिटाला आणखी गोल झळकावत भारतावर २-० ने आघाडी मिळवली. एन श्रोडरने हा गोल केला.

पहिल्या दोन क्वार्टरमध्ये जर्मनीने १-० ने आघाडी घेतली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने २-० ने आघाडी घेतली. चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये जर्मनी आक्रमक खेळी केली. या दरम्यान भारताच्या शर्मिलाने मैदानात शिस्तभंग केल्याने तिला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. त्यामुळे तिला पाच मिनिटं मैदानाबाहेर थांबावं लागलं.

कर्णधार राणी रामपाल नेतृत्वाखालील भारतीय संघाने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. यापूर्वी पहिल्या सामन्यात नेदरलँडने भारताला ५-१ ने पराभूत केलं होतं. आता भारताचा पुढचा सामना ब्रिटनसोबत असणार आहे.