टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने कांस्य पदक पटकावलं. सिंधूचं ऑलिम्पिक स्पर्धेतील दुसरं पदक असून असा विक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला. या विजयानंतर पी. व्ही. सिंधूवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. तर मुलीच्या विजयानंतर आई वडिलांना भावना अनावर झाल्या आहेत.

सिंधूचं कौतुक करताना वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलीचा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी सांगितलं होतं. जिंकून ये आपण एकत्र आइसक्रिम खाऊ, आता माझी मुलगी पंतप्रधानांसोबत एकत्र आइसक्रिम खाणार आहे. आम्ही तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा केली होती. पण हे बोलणं सोपं आहे. पण तिने कांस्य पदक पटकावलं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सिंधू जेव्हा कधी ऑलिम्पिकमध्ये गेली आहे. तेव्हा तिने पदक पटकावलं आहे.”, असं सिंधूच्या वडिलांनी अभिमानाने सांगितलं.

मुलीबद्दल भावना व्यक्त करताना आईचा उर भरून आला होता. ” मी खूप खूश आहे. माझ्या मुलीने कांस्य पदक आपल्या नावावर केलं. उपांत्य फेरीत हारल्यानंतर ती दु:खी झाली होती. आम्ही तिचा आत्मविश्वास वाढवला. तिला सुवर्ण पदक मिळालं नाही. मात्र कांस्य पदक सुवर्ण पदकाच्या बरोबरीचं आहे”, अशा भावना पी विजया यांनी व्यक्त केल्या.

पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतुक केलं. तिच्यासोबत असलेला फोटो ट्वीट कर सिंधू देशाचा अभिमान असल्याचं सांगितलं आहे. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही सिंधूच्या विजयावर अभिमानास्पद प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.