टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आजच्या दिवसाची सुरूवात भारताची सुरू धडाक्यात झाली. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने स्वीडनच्या सोफिया मेडालेना धोबीपछाड देत ५३ किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यानंतर काही वेळाने झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत विनेशला पराभवाला सामोरं जावं लागलं. उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटचा बेलारुसच्या खेळाडूंनं पराभव केला. विनेश फोगटचा ३-९ अशा फरकाने पराभव झाला.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या १४व्या दिवशी कुस्तीपटू विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात स्वीडनच्या सोफिया मेडालेनाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. सोफिया मेडालेनाचा ७-१ अशा फरकाने पराभव केल्यानं विनेश उपांत्यपूर्व फेरीतही याच कामगिरीची पुनरावृत्ती करेश अशी आशा होती. मात्र, तिला पराभवाचा सामना करावा लागला.

उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटची लढत बेलारुसची कुस्तीपटू वेन्स कलाडझिंस्कायासोबत झाली. सामन्या सुरूवातीला वेन्सने आघाडी घेतली. विनेश फोगट २-५ ने पिछाडीवर पडली. वेन्स कोलडाझिंस्कायाने सुरूवातीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवत विनेश फोगटचा पराभव केला. वेन्सने ९-३ अशा फरकाने विजय मिळवला.

पराभूत विनेशला पदकाची संधी, पण…

कुस्तीपटू विनेश फोगटचा पराभव झाल्यानंतर कुस्तीप्रेमींची नाराजी झाली. तिच्याकडून असलेल्या पदकाच्या अपेक्षा मावळल्या. मात्र, असं असलं, तरीही विनेश फोगटला पदक आणू शकते. हे होण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडून वेन्स कलाडझिंस्काया अंतिम फेरीत प्रवेश करणं आवश्यक आहे. वेन्स अंतिम फेरीत दाखल झाल्यास विनेश फोगटला रॅपिचाज राऊडनुसार पदकासाठी खेळण्याची संधी मिळू शकते.