आफ्रिकेच्या फुटबॉल संघातील दोन खेळाडू, विश्लेषकाला लागण

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिक अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असतानाही स्पर्धेवरील करोनाचे सावट वाढतच आहे. दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघातील दोन खेळाडू आणि चित्रफीत विश्लेषक यांना रविवारी करोनाची लागण झाली असून यामुळे संपूर्ण संघाला सक्तीच्या विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारपासून ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून आफ्रिकेचा संघ सध्या ऑलिम्पिकनगरीमध्ये वास्तव्यास आहे. शनिवारी ऑलिम्पिकनगरीत करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. परंतु रविवारी ऑलिम्पिकनगरीतील खेळाडूंनाच करोना झाल्यामुळे येथील आरोग्य सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

‘‘थाबिसो मोनयेन आणि कामोहेलो माहलाट्सी या दोन खेळाडूंसह संघाचे चित्रफीत विश्लेषक मारिओ माशा यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण संघ सध्या विलगीकरणात असून सोमवारी होणाऱ्या पहिल्या सराव सत्राला आम्हाला मुकावे लागेल,’’ असे आफ्रिका फुटबॉल संघाचे व्यवस्थापक मॅक्सोली सिबम यांनी सांगितले. त्याशिवाय माहलाट्सी याची प्रकृती अन्य दोघांच्या तुलनेत अधिक गंभीर असल्याची माहिती सिबम यांनी दिली.

चाहत्यांना बसमधून टोक्योची सफर

ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी असंख्य देशी-विदेशी चाहते सध्या जपानमध्ये जमा झाले आहेत. या सर्वाना एका बसमधून संपूर्ण टोक्यो शहराची भटकंती करवण्यात येत आहे. यामधून चाहत्यांना ऑलिम्पिकनगरी, टोक्यो टॉवर, रेनबो पुल यांसारखी ठिकाणे पाहायला मिळत आहेत.