टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठत इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास अर्जेटिनाने उपांत्य फेरीच्या खिंडीतच रोखला आहे. अंत्यत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारताला २-१ असे हरवले. अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने गोल केला.

भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर देशाला सुवर्णपदकाची आस लागली होती. भारतीय हॉकी संघानेही दमदार लढत देत बलाढ्य अर्जेंटिनाला चांगलाच घाम फोडला. सुरुवातीच्या दुसऱ्या मिनिटालाच ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नवर गोल करत प्रतिस्पर्धी संघाला बुचकळ्यात टाकले.

 

बारिनोवोचे दोन गोल

पहिल्या क्वार्टरमध्ये भक्कम बचाव आणि जबरदस्त आक्रमण पाहून अर्जेंटिनानेही व्यूहरचना रचायला सुरुवात केली. मॅन-टू-मॅन मार्किंग पद्धतीने भारताला एका सापळ्यात अडकवत दुसऱ्या क्वार्टरमध्ये दमदार पुनरागमन केले. बारिनोवोने गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरच्या समाप्तीला ५ मिनिटे शिल्लक असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. त्यानंतर भारताला अजून दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचा पंचानी आढावा घेतला. त्यामुळे तो कॉर्नर भारताला मिळाला नाही.

हेही वाचा –Tokyo Olympics 2020 : फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं! रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश!

दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत २-१ अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पिछाडीर पडलेल्या भारताने शेवटपर्यंत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण अर्जेंटिनाच्या बचावपटूंनी त्यांला २३ मीटरच्या आत पोहोचू दिले नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला १० मिनिटे शिल्लक असताना पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यांना गोल करता आला नाही. भारतीय संघ शेवटच्या काही मिनिटांत अर्जेंटिनाशी बरोबरी साधण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण अर्जेंटिनाची गोलकीपरने भक्कम बचाव करत भारताचे आक्रमण रोखले.

अंतिम सामन्याचे स्वप्न धूळीस मिळाले असले तरी भारताला कांस्यपदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी त्यांना ग्रेट ब्रिटनला धूळ चारावी लागेल.