ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर निराश झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला अ-गटातील दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून १-७ अशा दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. मात्र या पराभवाला मागे टाकत भारतीय हॉकी संघाने विजयाची चव चाखली आहे. भारताने स्पेनचा ३-० ने पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा

भारतीय संघाला आठव्या मिनिटाला पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण सिमरनजीतकडून ती संधी हुकली. यानतंर स्पेनने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती, पण भारतीय संघाने त्यांना रोखून धरलं होतं. अखेर १४ व्या मिनिटाला सिमरनजीतने पहिला गोल करत भारताचं खातं उघडलं.

भारताला पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. रुपिंदर यावेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेत दुसरा गोल केला आणि २-० ने आघाडी घेतली. २४ व्या मिनिटाला पीआर श्रीजेशला मैदानात बोलण्यात आलं होतं. हाफ टाइम होईपर्यंत भारत २-० ने आघाडीवर होता. स्पेनेकडून वारंवार आक्रमक खेळी करत सामन्या पुनरागम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय खेळाडूंनी संयमी खेळी करत स्पेनला रोखलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली.