युवा गटात विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या दिपक पुनियाने शनिवारी नवा पराक्रम केला. नुर-सुलतानमधील विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत त्याने ८६ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत विजय मिळवली आणि टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकिट मिळवले. या विजयासह तो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला.

उपांत्य फेरीत दिपक पुनियाने कोलंबियाच्या कार्लोस अर्टुरो मेंडिझ याच्याशी दोन हात केले. त्याने मेंडिझला ७-६ असे पराभूत केले. एक मिनिटाचा खेळ शिल्लक असताना तो ३-६ ने असा पिछाडीवर होता. पण त्याने शेवटच्या मिनिटात सामना पलटवला. आता सुवर्ण पदकासाठी त्याचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टीफन रेचमुथ याच्याशी होणार आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या राहुल आवारेने नॉन-ऑलिम्पिक कोटामध्ये ६१ किलो वजनी गटात विजय नोंदवून उपांत्य फेरी गाठली.