आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्पष्टीकरण

लॉसान : जुलैमध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबाबत तातडीने कठोर निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (आयओसी) देण्यात आले आहे. ऑलिम्पिक पुढे ढकलावा, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आयओसी’कडून हे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘‘टोक्योमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. अजून ऑलिम्पिकला चार महिन्यांहून अधिक काळ बाकी आहे. या स्थितीत कोणताही निर्णय तातडीने घेता येणार नाही. ऑलिम्पिक आयोजनाबाबतची सध्या सुरू असणारी चर्चा ही अफवा आहे,’’ असे ‘आयओसी’कडून स्पष्ट करण्यात आले. मात्र करोनामुळे ऑलिम्पिकच्या तयारीवरही परिणाम होत असल्याचे ‘आयओसी’कडून मान्य करण्यात आले.

ऑलिम्पिक क्रीडाज्योत कार्यक्रमात बदल

टोक्यो : करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडाज्योत कार्यक्रम निम्म्यावर आणण्याचा निर्णय ऑलिम्पिकच्या आयोजकांनी घेतला आहे. प्रेक्षकांना रस्त्याच्या कडेला उभे राहून क्रीडा ज्योत पाहण्याची परवानगी आहे. मात्र त्यासाठी मोठी गर्दी करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. क्रीडा ऑलिम्पिक ज्योत फुकूशिमा येथूनच मार्गस्थ होणार आहे. मात्र त्यावेळेस प्रेक्षकांना करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाहण्याची मनाई करण्यात आली आहे.

ऑलिम्पिक समिती सदस्यालाच करोना

टोक्यो : जपानच्या ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशिमा यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘‘मला करोना झाल्याचे चाचणीतून सिद्ध झाले आहे. मला बारीक ताप आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणार आहे,’’ असे ताशिमा यांनी सांगितले.

स्पेनच्या २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचे निधन

माद्रिद : करोनामुळे २१ वर्षीय फ्रान्सिस्को गार्सिया या युवा फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाचे निधन झाले. तो स्पेनमधील दुसऱ्या गटातील लीगमधील संघ अ‍ॅटलेटिको पोर्टाडा अल्टाचे प्रशिक्षकपद सांभाळायचा. स्पेनमध्ये करोनामुळे आतापर्यंत ३००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय नऊ हजारांहून अधिक जण बाधित आहेत.

बुंडेसलीगाच्या लढती २ एप्रिलपर्यंत रद्द

फ्रॅँकफर्ट : जर्मनीतील बुंडेसलीगा फुटबॉल स्पर्धेच्या लढती २ एप्रिलपर्यंत करोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. दोन अव्वल गटांमधील एकूण ३६ संघांचा बुंडेसलीगामध्ये समावेश आहे. स्पर्धेबाबतचा निर्णय एप्रिलमध्ये होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली तर प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचा निर्णय होऊ शकतो, असे जर्मन फुटबॉल संघटनेने म्हटले आहे.

डायमंड लीगमुळे तीन स्पर्धा पुढे ढकलल्या

पॅरिस : अ‍ॅथलेटिक्समधील डायमंड लीगच्या तीन स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १७ एप्रिलला दोहा येथे, १६ मे रोजी शांघायला आणि ९ मे रोजी चीनमध्ये या अ‍ॅथलेटिक्सच्या मैदानी क्रीडा स्पर्धा होणार होत्या.

ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धा रद्द

लंडन : लंडनमध्ये होणारी युरोपातील ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धा करोनामुळे रद्द करण्यात आली आहे. सुरुवातीला १४ मार्चपासून होणारी ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शनिवारी संध्याकाळचे सत्र आटोपल्यावर स्पर्धा रद्द करण्यात आली.