टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या तिरंदाजी पुरूष एकेरी स्पर्धेतील पदकाच्या आशा मावळल्या. पुरूष एकेरीच्या एलिमिनेशन राऊंड अर्थात उपउपांत्यपूर्व फेरीत भारताचा अव्वल तिरंदाज अतानू दास याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे ५२ किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या अमित पंघलचा पराभव झाला. कोलंबियाच्या युबेर्जन मार्टिनने त्याचा ४-१ अशा फरकाने पराभव केला.

देशातील आघाडीचा तिरंदाजपटू अतानू दास यांच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र, उपउपांत्यपूर्व फेरीतच अतानू दासला पराभवाचा सामना करावा लागला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या नवव्या दिवशी पुरूष एकेरीची एलिमिनेशन राऊंड अर्थात उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. यात भारताचा अतानू दास विरुद्ध जपानच्या ताकाहारु फुरूकावा यांच्यासोबत झाला.

पहिल्या सेटमध्ये अतानू दासचा पराभव झाला. ताकाहारूने पहिल्या सेटमध्ये २७ गुण केले, तर अतानूने २५. पहिला सेट गमावल्यानंतर अतानूने दुसऱ्या सेटमध्ये वापसी केली. पण, दुसरा बरोबरीत सुटला. दोघांनीही २८-२८ गुण केले. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अतानूने आघाडी घेतली. मात्र, चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये ताकाहारूने पुन्हा वापसी करत अतानू दासचा पराभव केला.

अमित पंघल युबेर्जेनकडून पराभूत

बॉक्सिंग स्पर्धेत पुरूषांच्या ५२ वजनी गटात भारताच्या अमित पंघलचा पराभव झाला. कोलंबियाच्या युबेर्जेन मार्टिनने पंघलचा ४-१ अशा फरकाने पराभव केला. या ऑलिम्पिकमध्ये पुरूष बॉक्सिंगपटूंकडून भारतीयांची पुन्हा निराशा झाली.

महिलांच्या बॅडमिंटन एकेरीत भारतीयांची पी.व्ही. सिंधूच्या सामन्याकडे नजर असेल. ती तिचा उपांत्य सामना खेळणार आहे. दुसरीकडे नेमबाजीमध्ये महिलांच्या ५० मीटर ३ पोझिशनच्या स्पर्धा होणार आहेत, ज्यामध्ये सर्वांचं लक्ष अंजुम मौदगिल आणि तेजस्विनी सावंत यांच्या खेळावर असणार आहे.