करोना विषाणूचा प्रादूर्भाव होत असतानाही टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत जपानचे सम्राट नारूहिटो यांनी चिंता व्यक्त केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असून यानिमित्ताने जगभरातील खेळाडू, अधिकारी, पुरस्कर्ते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जपानमध्ये दाखल होणार असून त्यांच्यामार्फत करोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने होण्याची भीती व्यक्त होत आहे.

‘‘देशातील करोना स्थितीबाबत सम्राटांनी चिंता व्यक्त केली आहे. जनतेमधूनही ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत नकारात्मक सूर ऐकू येत आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या आयोजनामुळे देशात करोनाचा प्रसार वेगाने होईल. त्यामुळे संयोजकांनी करोनाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता कठोर उपाययोजना राबवण्याची गरज आहे,’’ अशी भीती नारूहिटो यांनी व्यक्त केली.

सामान्य जनता आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विरोध होत असला तरी जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा हे ऑलिम्पिकच्या आयोजनावर ठाम आहेत. सुगा यांनी टोक्योमधील निर्बंध काहीसे शिथिल केले असले तरी येत्या काही आठवड्यात टोक्योमधील परिस्थिती पुन्हा गंभीर बनेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर पूर्वनियोजनानुसार नारूहिटो हे ऑलिम्पिकच्या उद्घाटनाची घोषणा करणार होते. पण उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही, असेही सांगण्यात येत आहे.