Advertisement

Tokyo 2020 : सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘हा’ देश देतो सर्वाधिक पैसा, तीन देश करतात आयुष्यभर मदत

युरोपमधील काही मोठे देश ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर कोणत्याही प्रकारची बक्षीस रक्कम देत नाहीत.

जगातील २००हून अधिक देशांचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत. ११ हजार खेळाडू सुवर्णपदकासाठी लढत आहेत. अमेरिकेने ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकली आहेत. सुवर्ण जिंकल्यावर अमेरिका खेळाडूंना सुमारे २८ लाख रुपये देईल. सिंगापूरसारख्या छोट्या देशात उपलब्ध असलेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे. तीन मोठे देश ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना आजीवन मदत करतात. त्याचबरोबर युरोपमधील काही मोठे देश कोणत्याही प्रकारची बक्षीस रक्कम देत नाहीत.

फोर्ब्सच्या बातमीनुसार, एस्टोनियामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला दरवर्षी सुमारे ४ लाख रुपये मिळतील. याशिवाय निवृत्तीवर अधिक भत्ता मिळतो. जर एखादा खेळाडू २९ वर्षात सुवर्ण जिंकतो आणि ७८ वर्षे जगतो, तर त्याला सुमारे २.२५ कोटी मिळतील. इंडोनेशिया आणि मलेशियामध्येही दरमहा भत्ता दिला जातो. ब्रिटन, न्यूझीलंड आणि स्वीडनमध्ये पदक जिंकण्यासाठी बक्षिसाची रक्कम दिली जात नाही. सुवर्णपदकांसाठी सर्वाधिक पैसे देणारे देश कोणते आहेत, ते जाणून घेऊया.

सिंगापूर – सुवर्णपदक जिंकल्यावर जास्तीत जास्त बक्षीस रक्कम सिंगापूरमध्ये दिली जाईल. येथे सुवर्णपदक जिंकल्यावर तुम्हाला सुमारे ५.५० कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर रौप्यपदक विजेत्याला २.७५ कोटी तर कांस्यपदक मिळवणाऱ्याला १.३७ कोटी मिळतील. मात्र आतापर्यंत सिंगापूरला एकही पदक मिळालेले नाही. त्यांचे खेळाडू पुढील आठवड्यात महिलांच्या टेबल टेनिसमध्ये पदके जिंकू शकतात.

तैवान – येथे तुम्हाला सुवर्णपदक जिंकल्यानंतर सुमारे ५.३३ कोटी रुपये मिळतात. महिला वेटलिफ्टर कुओ हिसिंग चुन हिने ५९ किलो वजनी गटात ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे. जे खेळाडू त्यांच्या इव्हेंटमध्ये सातवे किंवा आठवे स्थान मिळवतात, त्यांनाही सुमारे २४ लाख रुपये मिळतात. एवढीच रक्कम अमेरिका सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूंना देते.

इंडोनेशिया – इंडोनेशियाने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यावर २.५८ कोटी रुपये दिले होते. इंडोनेशियाला आतापर्यंत टोक्योमध्ये एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळाली आहेत. एवढेच नव्हे, तर चॅम्पियन खेळाडूला दरमहा एक लाख रुपये भत्ता दिला जातो. त्याला हा भत्ता आयुष्यभर मिळतो.

बांगलादेश – बांगलादेशला अद्याप ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळालेले नाही. राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनुसार, सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला सुमारे २.२३ कोटी रुपये दिले जातील. याशिवाय रौप्य जिंकण्यासाठी १.१० कोटी आणि कांस्य जिंकण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपये उपलब्ध असतील.

कझाकिस्तान – कझाकिस्तानमध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर सुमारे १.८६ कोटी रुपये दिले जातील. रौप्यपदकावर १.१० कोटी आणि कांस्यपदकासाठी ५५ लाख दिले जातील. आतापर्यंत तीन खेळाडूंनी कांस्यपदके जिंकली आहेत.

मलेशिया – मलेशियामध्ये पदके जिंकल्यावर खेळाडूंना पुरस्काराव्यतिरिक्त दरमहा भत्ता दिला जातो. खेळाडूला सुवर्णपदक जिंकल्यावर १.७७ कोटी रुपये मिळतील आणि दरमहा ९० हजार रुपये भत्ता दिला जाईल. रौप्यपदक विजेत्याला ५३ लाख रुपये, ५२ हजार रुपये भत्ता, तर कांस्यपदक विजेत्याला १८ लाख रुपये, ३५ हजार रुपये भत्ता मिळतो.

इटली – येथे सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता सुवर्ण जिंकणाऱ्याला १.६० कोटी रुपये मिळतील. रौप्यपदक विजेत्याला ८० लाख आणि कांस्यपदकांसाठी ५० लाख दिले जातील. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये इटलीने २८ पदके जिंकली आणि एकूण ९वे स्थान मिळवले. टोक्योमध्ये इटालियन खेळाडूंनी आतापर्यंत २ सुवर्ण, ८ रौप्य आणि १४ कांस्यपदकांसह २४ पदके जिंकली आहेत.

फिलिपिन्स – फिलिपिन्सची वेटलिफ्टर हिडलिन डियाझने टोक्योमध्ये ऑलिम्पिक इतिहासातील देशातील पहिले सुवर्णपदक जिंकले. येथे तुम्हाला सुवर्णपदक जिंकल्यावर सुमारे १.५० कोटी मिळतात. याशिवाय स्थानिक एजन्सीकडून खेळाडूला सुमारे ७ कोटी रुपये दिले जातील.

हंगेरी – हंगेरीमध्ये, वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही स्पर्धांमधील खेळाडूंना समान रक्कम मिळते. येथे, सुवर्ण जिंकल्यावर सुमारे १.२५ कोटी रुपये, रौप्य जिंकल्यावर ८८ लाख आणि कांस्य जिंकल्यावर ७० लाख रुपये दिले जातील. येथील खेळाडूंनी आतापर्यंत २ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदके जिंकली आहेत.

हेही वाचा – ‘‘संजू सॅमसन आळशी आणि बेजबाबदार फलंदाज”, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला

कोसोव – कोसोवमध्ये, खेळाडूंव्यतिरिक्त, प्रशिक्षकाला देखील बक्षीस दिले जाते. सुवर्ण जिंकल्यावर खेळाडूला ८८ लाख रुपये तर प्रशिक्षकाला ४४ लाख रुपये दिले जातात. रौप्यपदक विजेत्याला ५२ लाख, प्रशिक्षकाला २६ लाख तर कांस्यपदक विजेत्याला ३६ लाख, प्रशिक्षकाला १८ लाख मिळतात.

21
READ IN APP
X
X