भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अंकिता रैना आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. ऑलिम्पिकमध्ये सानिया आणि अंकिता महिलांच्या दुहेरी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतील. ३४ वर्षीय सानिया आता चार ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला खेळाडू ठरणार आहे. तर अंकिता रैना प्रथमच ऑलिम्पिकमध्ये आपले नशीब आजमावणार आहे.

जागतिक क्रमवारीत सानिया ९व्या स्थानी आहे. २८ वर्षीय अंकिता एकेरीत १८३ आणि दुहेरीत ९५व्या स्थानावर आहे. सानियाने गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे सुनीता राव, रश्मी चक्रवर्ती आणि प्रार्थना ठोंबरे यांच्यासह बीजिंग, लंडन आणि रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता.

 

भारताच्या सुमित नागलने ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरी गटात प्रवेश केला आहे. २३ वर्षीय नागल ऑलिम्पिकमध्ये काही निराशाजनक निकालांसह प्रवेश करेल, कारण ऑस्ट्रेलियन ओपनसह त्याला पहिल्या फेरीच्या सात पराभवांचा सामना करावा लागला आहे. सहा चॅलेन्जर स्पर्धांमध्ये त्याने केवळ तीन वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठली. मार्चमध्ये ब्यूनस आयर्स मधील एटीपी २५० स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. वर्षाच्या सुरुवातीला तो १३७व्या क्रमवारीत होता, आता तो १५४व्या स्थानी आहे.

हेही वाचा – VIDEO : आत्तापर्यंतचा सर्वात मोठा षटकार?, इंग्लंडच्या फलंदाजाचा ‘गगनचुंबी’ फटका पाहून सर्व झाले स्तब्ध

गेल्या वर्षी होणार होत्या ऑलिम्पिक स्पर्धा

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा करोनामुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आली होती. यंदा ऑलिम्पिक स्पर्धा होत असून, करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदाऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा चालणार असून, करोनाने ऑलिम्पिक स्पर्धेच्या दारावर थाप दिली आहे.