आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांचे स्पष्टीकरण
टोक्यो : ‘करोना’ विषाणू संसर्गाचा धोका जगभर वाढत असला तरी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वेळापत्रकानुसारच आयोजित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) कटिबद्ध आहे, असे समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी स्पष्ट केले.
‘करोना’चा संसर्ग वाढू नये, म्हणून देशातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी गुरुवारी दिले. त्यानंतर बॅश यांनी ऑलिम्पिकसंदर्भात दिलेले स्पष्टीकरण महत्त्वाचे आहे.
जपानमध्ये ‘करोना’मुळे चार जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २०० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. ‘आयओसी’चे वरिष्ठ सदस्य डिक पाऊंड यांनी जागतिक
आरोग्य संघटनेकडून आदेश आल्यास ऑलिम्पिक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकेल, असे म्हटले होते. मात्र पाऊंड यांच्या प्रतिक्रियेवर बॅश यांनी बोलण्यास नकार दिला.
‘‘पात्रता स्पर्धा वेळेत होण्याची खात्री करायची आहे. त्याच वेळेला खेळाडूंच्या सुरक्षेची खातरजमा करायची आहे. जपानचे अधिकारी, जागतिक आरोग्य संघटना आणि चीन ऑलिम्पिक समिती यांच्यासह जगभरातील राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या सर्वासोबत सातत्याने समन्वय ठेवून पुढे जायचे आहे,’’ असे बॅश यांनी स्पष्ट केले.
जागतिक आरोग्य संस्थेचा आदेश आला तरच ऑलिम्पिक रद्द -पाऊंड
जागतिक आरोग्य संस्थेकडून किंवा एखाद्या नियामक मंडळाकडून सांगण्यात आले, तरच ऑलिम्पिक रद्द करण्याबाबतचा विचार करण्यात येईल, असे ‘आयओसी’चे वरिष्ठ सदस्य डिक पाऊंड यांनी सांगितले. ‘‘ऑलिम्पिक जवळपास साडेसहा वर्षे आधी ठरते. त्यामुळे ऑलिम्पिक वेळापत्रकाप्रमाणेच करण्याचा ‘आयओसी’चा प्रयत्न असेल. मात्र जर जागतिक आरोग्य संस्थेकडून किंवा एखाद्या नियामक मंडळाकडून सांगण्यात आले, तरच ऑलिम्पिक रद्द करण्याबाबतचा विचार करण्यात येईल,’’ असे पाऊंड यांनी सांगितले.
ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा ठरल्याप्रमाणेच; जागतिक बॅडमिंटन महासंघ ठाम
नवी दिल्ली : ‘करोना’मुळे विविध खेळांच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धावर परिणाम झाला असला तरी बॅडमिंटनच्या पात्रता स्पर्धाचा कालावधी ठरल्याप्रमाणेच राहील, असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) स्पष्ट केले आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठी खेळाडू प्रयत्न करत असताना स्पर्धेचा कालावधी बदलणे योग्य नाही. त्यामुळे खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे ‘बीडब्ल्यूएफ’ने स्पष्ट केले.
आशियाई ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली
नवी दिल्ली : ‘करोना’ विषाणू संसर्गाच्या चिंतेमुळे बिशकेक (किर्गिझस्तान) येथे होणारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकललण्यात आली आहे. ‘करोना’च्या भीतीमुळे किर्गिझस्तानच्या सरकारने देशातील सर्व क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 2:17 am