टोक्यो : करोनामुळे आधीच लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला आता आणखीन मोठा धक्का बसला आहे. शिंझो आबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने आता टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आतडय़ाच्या सुजेने होणाऱ्या अल्सरमुळे आबे यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करावे लागले होते. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या तब्येतीच्या कुरबुरींमुळे त्याचा परिणाम सरकारच्या कामावर होत होता. आबे हे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे मुख्य पाठीराखे असून त्यांच्या राजीनाम्यामुळे आता जगातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

२०१३ साली टोक्योला ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळाले होते. त्यानंतर २०१६ रिओ ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्याप्रसंगी आबे हे खास गणवेशात रंगमंचावर अवतरले होते. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे नव्या पंतप्रधानपदाच्या अध्यक्षतेखाली टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन केले जाईल; पण करोनावरील लस सापडली नाही तर ऑलिम्पिकचे आयोजन धोक्यात येऊ शकते.

ऑलिम्पिक आयोजनाबाबत स्पर्धेच्या संयोजकांशी जपान सरकारची बोलणी सुरू असून करोनाची लस लवकर मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कॅबिनेट सचिव योशिहिडे सुगा म्हणाले.