Advertisement

Tokyo Olympics Wrestling : भारताची विनेश फोगट उपांत्यपूर्व फेरीत; पहिल्याच सामना ७-१ ने जिंकला

भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने टोक्यो ऑलिम्पिकमधील ५३ किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आज सकाळी झालेल्या सामन्यामध्ये विनेशने आपल्या प्रतिस्पर्ध्याला ७-१ च्या स्कोअरसहीत धोबीपछाड देत ऑलिम्पिकमधील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला.

विनेशने स्वीडनच्या सोफिया मेडालेना हिला ७-१ ने पराभूत केलं.

आता उपांत्यफेरीमध्ये विनेशचा सामना बेलारुसच्या वानेसा कालाडझिन्स्कायाशी होणार आहे. हा सामना आज भारतीय वेळेनुसार सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी सुरु होणार आहे.

दुसरीकडे आज आणखीन काही खेळाडूंवरही भारताच्या पदकाच्या आशा कायम आहेत. कुस्तीपटू रवी दहिया बुधवारी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या लढतीपर्यंत धडक मारणारा भारताचा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे. ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत त्याने कझाकस्तानच्या नुरिस्लाम सानायेव्हला चीतपट करून अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. आज होणाऱ्या अंतिम फेरीत रवीची गाठ रशियाच्या विश्वविजेत्या झॅउर युगुएव्हशी पडणार आहे.  कुस्तीमधील हे भारताचे सहावे पदक असेल.

रवीच्या आधी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती; परंतु त्याला उपविजेतेपदापर्यंत समाधान मानावे लागले होते. चौथा मानांकित रवी सानायेव्हविरुद्धच्या लढतीत २-९ असा पिछाडीवर होता; परंतु रवीने हिमतीने मुसंडी मारत प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही पायांवर नियंत्रण मिळवत त्याला चीतपट करीत हा डाव जिंकला. पहिल्या सत्रात रवी २-१ असा आघाडीवर होता; परंतु सानायेव्हने तयारीनिशी रवीच्या डाव्या पायाची पकड मिळवत सहा गुण मिळवले. परंतु तंदुरुस्तीच्या बळावर एका मिनिटात त्याने सामन्याचे चित्र पालटले. रवीने त्याला चीतपट करीत सामना निकाली ठरवला. रवीने सलामीच्या सामन्यात कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरोसला १३-२ असे हरवले, त्यानंतर बल्गेरियाच्या जॉर्जी व्हॅलेंटिनोव्हचा १४-४ असा पराभव केला.

दीपकला कांस्यच्या आशा

८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसकडून पराभूत होणाऱ्या दीपक पुनियाच्या कांस्यपदकाच्या आशा जिवंत आहेत. आता गुरुवारी मायलीस अ‍ॅमिने आणि अली शबानाऊ यांच्यातील रॅपिचाज सामन्यातील विजेत्याशी दीपकची कांस्यपदकाची लढत होईल.

24
READ IN APP
X
X