टोक्यो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने ४९ वर्षांत पहिल्यांदा हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, पण शेवटच्या चार टप्प्यात त्यांचा प्रवास संपुष्टात आला. वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमने मंगळवारी टोक्यो ऑलिम्पिकमधील ओई हॉकी स्टेडियमवर त्यांना ५-२ने नमवले. सामन्यात गोल करणाऱ्या मनदीप सिंगने  भारतीयाना आश्वासन दिले आहे. ”हा भारतासाठी दुःखाचा दिवस आहे आम्ही हार मानणार नाही, कांस्यपदक मिळवायचे आहे”, असे मनदीपने सांगितले.

मनदीपने दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला आघाडी मिळवून दिली. विश्वविजेत्यांविरुद्ध भारताने बर्‍याच चुका केल्या असल्याचेही मनदीपने मान्य केले. पराभवानंतर मनदीप म्हणाला, ”हा एक दुःखद दिवस आहे कारण आम्ही हरलो, पण आमच्याकडे कांस्यपदकाचा सामना अजून शिल्लक आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी तयारी करू. आम्ही एक अतिशय महत्वाचा सामना गमावला, आम्ही काही मोठ्या चुका केल्या, पण कांस्यपदकाच्या लढतीत आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ. आमच्याकडे एक दिवस आणि एक सामना शिल्लक आहे, म्हणून आम्ही लढणार.”

हेही वाचा – “भारताची कामगिरी गरिबासारखी, देशाचे खरे रत्न मेजर ध्यानचंद यांना आपण विसरून जातो”

असा रंगला भारत-बेल्जियम सामना

पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवले. सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच बेल्जियमने गोल करत १-० ची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक दोन गोल करत २-० ने आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने २-१ ची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना २-२ च्या बरोबरीत राहिला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे बेल्जियमने शेवटच्या क्वार्टरमध्ये तीन गोल झळकावले. बेल्जियमकडून अ‍ॅलेक्झॅण्डर हेनरीक्सने हॅट्ट्रिक केली.