टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांनी अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे. बॅडमिंटन पुरुष एकेरी एसएल ३ वर्ग उपांत्य फेरीत प्रमोद भगत यांनी जपानच्या फुजीहाराचा २-० असा पराभव केला. प्रमोद भगत यांनी उपांत्य फेरीचा सामना २१-११, २१-१६ असा जिंकला. आत्तापर्यंत कोणताही भारतीय खेळाडू ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिक खेळांमध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकू शकलेला नाही. प्रमोद यांना बॅडमिंटनमध्ये भारताचे पहिले सुवर्ण जिंकण्याची संधी आहे.

भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत पुरुष एकेरी एसएल-३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. प्रमोद भगत यांनी उपांत्य फेरीत जपानी खेळाडू डी फुजीहाराचा पराभव केला. प्रमोद यांनी जबरदस्त कामगिरी करत जपानी खेळाडूला २१-११ आणि २१-१६ अशा फरकाने हरवले. या विजयासह प्रमोद यांचे पदक निश्चित झाले आहे. शेवटच्या सामन्यात प्रमोद भगत हे सुवर्णपदकासाठी बेथेल डॅनियल्ससोबत लढणार आहे. तर दुसरीकडे, मनोज सरकारला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मनोजला उपांत्य फेरीत बेथेल डॅनियल्सने २१-८, २१-१० ने पराभूत केले. आता मनोज सरकार कांस्यपदकासाठी फुजीहारा दाईसुकेचा सामना करेल. दोन्ही सामने दुपारी ३ वाजता खेळले जातील.

नेमबाजी: मनीष आणि सिंगराजची जोडी अंतिम फेरीत

मनीष आणि सिंहराज जोडीने ५० मीटर पिस्तूल एसएच -१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्रता मिळवली आहे. मनीष आणि सिंगराजची जोडी ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत आज आपला सामना खेळतील.

टोक्यो पॅरालिम्पिकचा ११ वा दिवस, खेळांडूसाठी खूप महत्वाचा आहे. आज भारतातील अनेक खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये स्पर्धा करणार आहेत. शुक्रवारी १० व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तीन पदके जिंकली. शुक्रवारी प्रवीण कुमारने उंच उडीत रौप्य पदक, अवनी लेखारा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल पी -३ एसएच -१ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आणि तिरंदाज हरविंदर सिंगने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला.

पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत जिंकली सर्वाधिक पदके

भारताकडे आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये १४ पदके आहेत. आतापर्यंत ५३ वर्षात ११ पॅरालिम्पिकमध्ये १२ पदके आली आहेत. पॅरालिम्पिक १९६० पासून होत आहे. भारत १९६८ पासून पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. भारताने १९७६ आणि १९८० मध्ये भाग घेतला नाही.