टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. तिरंदाज हरविंदर सिंगने कोरियाच्या सू मिन किमचा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्याने हा सामना ६-५ ने जिंकला. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच तिरंदाजीमध्ये पदक पटकावले आहे.

सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १३ पदके जिंकली आहेत. भारताकडे आता २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रिओ पॅरालिम्पिक (२०१६) मध्ये भारताने २ सुवर्णांसह ४ पदके जिंकली होती.

यासह आज भारताला तिसरे पदक मिळाले. यापुर्वी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली.

प्रवीण कुमारने देखील आज उंच उडीत रौप्य पदक पटकावले. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये सुवर्णपदकासाठी अगदी अटीतटीची लढत पहायला मिळाली. पहिल्या प्रयत्नात प्रवीणने १.८८ मीटरची उडी मारत पहिलं स्थान पटकावलं. नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने १.९३ मीटरची उडी मारली. इथून एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये अटीतटीचा सामना सुरु झाला. तिसऱ्या प्रयत्नात प्रवीणने १.९७ मीटरची उडी मारली. त्याला ब्रिटनच्या एडवर्ड्सने आणि पोलंडच्या मिसीज लिपिएटोने कडवी झुंज दिली. पुढील प्रयत्नात प्रवीण आणि लिपिएटो दोघांनी २.०४ मीटर उडी मारली. त्यापाठोपाठ एडवर्ड्सनेही ही कामगिरी करत पदकासाठीची चुरस आणखीन वाढवली. पुढील प्रयत्नात प्रवीणने २.०७ मीटरची उडी मारत आशियाई विक्रम स्वत:च्या नावे केला. अंतिम पदकासाठी एडवर्ड्स आणि प्रवीण यांच्यामध्ये चुरस रंगली. मात्र येथे एडवर्ड्सने २.१० मीटर उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरलं.