टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी भारताने विजय सुरुवात करत आणखी एक पदक मिळवलं आहे. भारताने शनिवारी ‘पदकचौकार’ खेचल्यानंतर सुहास यशिराज यांनी समारोपाच्या दिवशी रौप्यपदक जिंकत पदकांमध्ये भर टाकली आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यशिराज यांनी अंतिम फेरी गाठली होती. सुहास यांनी सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १८ विक्रमी आकडा गाठला आहे.

सुहास यथिराज आयएएस अधिकारी असून टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे. सुहास यथिराज पदक जिंकणारे पहिले आयएएस अधिकारी ठरले आहेत. अंतिम सामन्यात सुहास यशिराज यांच्यासमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचं आव्हान होतं. याआधी सुहास यांनी  उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९, २१-१५ अशा ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवला होता.

अंतिम सामन्यात फ्रेडी सेटियावानने सुहास यथिराज यांना पराभूत करत सुवर्णपदक जिंकलं. तर सुहास यथिराज यांनी रौप्यपदकाची कमाई केली आहे.

दरम्यान कांस्यपदकासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या तरुण ढिल्लाँचा पराभव झाल्याने अजून एका पदकाची संधी गमावली आहे.