श्रीकांत आणि लक्ष्मण यांच्याकडे संघाचे सल्लागारपद
आयपीएलमधील हैदराबादचा संघ आता ‘सनरायजर्स’ म्हणून ओळखला जाणार आहे. या संघाने आता आपल्या पहिल्या मोसमाची जय्यत तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मुडी यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. याचप्रमाणे के. श्रीकांत आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या भारतीय क्रिकेटपटूंना सल्लागार म्हणून नेमले आहे. तसेच नव्या फ्रेंचायझीने संगकाराकडे कर्णधारपद राखले आहे.
सन टीव्ही नेटवर्क या हैदराबाद संघाच्या नव्या मालकाने डेक्कन चार्जर्सचे सनरायजर्स असे नामकरण केले आहे. याचप्रमाणे संघाच्या नव्या बोधचिन्हाचेही अनावरण केले. उंच उडणारा गरूड उगवणाऱ्या सूर्याकडे पाहात असल्याचे हे बोधचिन्ह आहे.
यावेळी श्रीकांत म्हणाला की, सनरायजर्स संघाचा सल्लागारपद सांभाळताना आनंद आणि उत्सुकतेचे असे दोन्ही भाव माझ्याकडे आहेत. मुडी, लक्ष्मण, डेल स्टेन आणि संगकारासारखे खेळाडू आमच्याकडे आहेत.
डेक्कन चार्जर्स संघामधील बहुतांशी खेळाडूंना सनरायजर्समध्ये ठेवण्यात येईल आणि पुढील महिन्यात होणाऱ्या लिलावामध्ये काही खेळाडूंना खरेदी करण्यात येणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.
‘‘पुणे संघाकडून मुक्त झालेल्या अंबाती रायुडू आणि स्मिथ यांच्यासारख्या खेळाडूंची आम्हाला आवश्यकता आहे,’’ असे श्रीकांत यांनी सांगितले. किंग्ज ईलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक म्हणून फारसे यशस्वी न ठरलेल्या मुडी यांनी आगामी हंगामात आत्मविश्वासाने कामगिरी करून दाखविणार असल्याचे सांगितले.