क्रिकेटमधील डकवर्थ-लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस यांचे बुधवारी लंडन येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) ही घोषणा केली.

टोनी यांनी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत डकवर्थ-लुइस पद्धत १९९७ मध्ये अमलात आणली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १९९९ मध्ये ती स्वीकारली. डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास गणिताची आकडेमोड करत षटके कमी करण्यात येतात. लुइस यांची ही प्रणाली क्रिकेटमध्ये चांगलीच गाजली. अजूनही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ-लुइस प्रणालीचा आधार घेतला जातो. लुइस यांना क्रिकेट आणि गणितातील या संशोधनाबद्दल ‘एमबीई’ या ब्रिटनमधील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘आयसीसी’कडून लुइस यांना श्रद्धांजली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टोनी लुइस यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. ‘‘सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास धावांचे लक्ष्य ठेवण्याची पद्धत लुइस आणि फ्रँ क यांनी दोन दशकांपूर्वी नव्याने अमलात आणली. लुइस यांचे योगदान सदैव स्मरणात राहील,’’ असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.