|| धनंजय रिसोडकर

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेमध्ये संतुलित संघांइतकेच त्या त्या देशांमधील स्टेडियम, त्याचे स्थान, तेथील वाऱ्याची दिशा आणि तेथील वातावरण या सर्व बाबी अत्यंत निर्णायक असतात. तसेच कोणत्या स्टेडियमवर कोणत्या संघांचे सामने होणार आहेत आणि ते स्टेडियम कोणत्या संघासाठी अधिक पोषक आहे, त्यावरदेखील अनेकदा सामन्यांचा निकाल लागतो. त्यामुळेच गृहमैदानांवर खेळणाऱ्या संघास प्राथमिक फेऱ्यांमध्ये नेहमीच या बाबींचा फायदा होतो. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकातील बहुतांश स्टेडियमच्या खेळपट्टय़ा यंदा फलंदाजीला पोषक स्वरूपाच्या बनवण्यात आल्या असल्याने त्यावर अधिकाधिक धावा निघण्याचे अंदाज बांधले जात आहेत. एकूण ११ स्टेडियममध्ये होणाऱ्या विश्वचषकातील प्रारंभीचा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर तर अंतिम सामना जगविख्यात लॉर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. सर्वच क्रिकेटप्रेमींना इंग्लंडच्या या ११ स्टेडियमबाबत उत्सुकता असल्याने विश्वचषकाच्या निमित्ताने घेतलेला हा स्टेडियमचा वेध-

१. लॉर्ड्स, लंडन

क्रिकेट विश्वातील पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी ज्या स्टेडियमवर १८८४ साली खेळली गेली त्या लॉर्ड्स मैदानाला क्रिकेटची पंढरी मानले जाते. या स्टेडियमला तब्बल २०५ वर्षांचा इतिहास आहे. मिडलसेक्स काऊंटी क्लबचे गृहमैदान म्हणून प्रख्यात या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता २८,००० एवढी आहे. या स्टेडियमवर मेरिलिबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) क्रिकेट वस्तुसंग्रहालय असून ते जगातील सर्वात जुन्या वस्तुसंग्रहालयांपैकी एक आहे. १९८३च्या विश्वचषकात भारताने याच मैदानावर अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजवर मात करीत कपिलदेवच्या नेतृत्वाखाली प्रथमच विश्वचषक जिंकला होता. या स्टेडियमवर साखळीतील पाच सामन्यांसह १४ जुलैला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

२. द ओव्हल, लंडन

सरे काऊंटी क्रिकेट क्लबचे गृहमैदान असलेल्या ओव्हल मैदानाची निर्मिती १८४५मध्ये झाली आहे. १८८०मध्ये सर्वप्रथम या मैदानावर कसोटी क्रिकेट सामना तर १९७३ सालापासून एकदिवसीय सामने खेळण्यास प्रारंभ झाला. तर २०१४ साली पहिला ट्वेन्टी-२० सामना या मैदानावर खेळवला गेला. या मैदानाला आता ‘किआ ओव्हल’ अशा नावाने ओळखले जाते. मैदानावर यंदाच्या विश्वचषकातील पाच सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यात भारताचा सर्वाधिक अवघड असा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा साखळी सामना ९ जूनला याच मैदानावर होणार आहे. मैदानाची प्रेक्षकक्षमता २५,५०० असून, या सामन्याची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत.

३. एजबस्टन, बर्मिगहॅम

वॉर्विकशायर काऊंटी क्लबचे गृहमैदान असलेल्या या स्टेडियमची उभारणी १८८२मध्ये करण्यात आली असून त्याची प्रेक्षकक्षमता २५ हजार इतकी आहे. १९०२ मध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना तर १९७२ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. या स्टेडियमवर एकूण पाच साखळी सामने आणि उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. त्यात भारताचा इंग्लंडविरुद्धचा सामना ३० जूनला तर बांगलादेशविरुद्धचा सामना २ जुलैला खेळवण्यात येणार आहे.

४. ब्रिस्टल काऊंटी ग्राऊंड

सर डब्ल्यू. जी. ग्रेस यांनी नावारूपाला आणलेले हे मैदान ग्लुस्टरशायर काऊंटी क्रिकेट क्लबचे गृहमैदान आहे. १९८३ मध्ये या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ झाला. तेव्हापासून एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांसाठी या मैदानाला पसंती दिली जाते. मात्र या स्टेडियमवर अद्याप एकही कसोटी सामना खेळला गेलेला नाही. १७,५०० प्रेक्षकक्षमता असलेल्या या मैदानावर विश्वचषकातील तीन सामने होणार आहेत.

५. सोफिया गार्डन्स, कार्डिफ

ग्लॅमॉर्गन काऊंटी क्लबचे गृहमैदान असलेल्या या स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीचा वापर अवघ्या दोन दशकांपूर्वी १९९९ सालापासून केला जात आहे. २००९ मध्ये या मैदानावर सर्वप्रथम कसोटी सामना खेळला गेला. या मैदानाची प्रेक्षकक्षमतादेखील काहीशी कमी म्हणजे १५,६४३ इतकीच आहे. या स्टेडियमवर विश्वचषकातील चार सामने खेळले जाणार आहेत.

६. रिव्हरसाइड ग्राऊंड, चेस्टर ले स्ट्रीट

डरहॅम काऊंटी क्लबचे गृहमैदान म्हणून ओळख असलेल्या या स्टेडियमची उभारणी १९९५मध्ये करण्यात आली. या मैदानावर १९९९ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला असून मैदानाची प्रेक्षकक्षमता १९,००० आहे. या स्टेडियमवर तीन साखळी सामने खेळवले जाणार आहेत.

७. लीड्स, हेडिंग्ले

जगातील सर्वात जुन्या स्टेडियममध्ये या मैदानाचा समावेश केला जातो. १८९९ मध्ये या स्टेडियमवर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता, तर १९७३ सालापासून या स्टेडियमवर एकदिवसीय सामने खेळवले जात आहेत. प्रायोजकत्वामुळे हे मैदान आता एमराल्ड हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते. १८,३५० प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियमवर भारत-श्रीलंकेच्या साखळी सामन्यासह चार सामने होणार आहेत.

८. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

लॅँकेशायर काऊंटी क्लबच्या या मैदानाची स्थापना १८६४ मध्ये झाली असून पहिला कसोटी सामना १८८४ साली खेळला गेला. १९७२ सालापासून या मैदानावर एकदिवसीय सामने खेळले जातात. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ही २६,६०० इतकी करण्यात आली असून भारताचा सर्वाधिक महत्त्वाचा साखळी सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना याच मैदानावर २७ जूनला होणार आहे. त्याशिवाय या मैदानावर सहा साखळी सामने आणि एक उपांत्य सामना खेळवला जाणार आहे.

९. ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

ट्रेंट नदीच्या काठावर असल्याने त्याच नावाने नावारूपाला आलेले हे स्टेडियम नॉटिंगहॅम्पशायर काऊंटी क्लबचे गृहमैदान आहे. १८४१मध्ये निर्मिती झालेल्या या मैदानावर १८९९ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता. या मैदानावर भारत-न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना खेळवला जाणार आहे. या मैदानाची प्रेक्षकक्षमता १७,५०० आहे.

१०. रोझ बाऊल, साऊदम्पटन

हॅम्पशायर काऊंटी क्लबचे हे मैदान त्या मानाने अगदी नवीन म्हणजे २००१मध्ये निर्माण झालेले आहे. २००३ सालापासून एकदिवसीय तर २०११ सालापासून कसोटी सामने या स्टेडियमवर होतात. या मैदानाच्याच परिघात एक निवासी संकुलदेखील असून ते या मैदानाचे वेगळेपण आहे. या स्टेडियमवर पाच साखळी सामने होणार असून, त्यात भारताचा सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेशी आणि २२ जूनला अफगणिस्तानशी होणार आहे.

११. काऊंटी ग्राऊंड, टॉंटन

१८८२ मध्ये स्थापन झालेल्या या स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामना सुरू होण्यासाठी एक शतकाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. १९८३ च्या विश्वचषकात या स्टेडियमवर पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला. सॉमरसेट काऊंटी क्लबचे स्टेडियम अशी ओळख असलेल्या मैदानाची प्रेक्षकक्षमता सर्वात कमी म्हणजे १२,५०० इतकीच आहे.