|| प्रशांत केणी

इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर फक्त फलंदाजांचे वर्चस्व राहील. पाचशे धावसंख्येचा टप्पा साध्य होऊ शकेल, असा अंदाज स्पर्धा सुरू होण्याआधी क्रिकेटमधील जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. आता यंदाच्या विश्वचषकातील ४८ पैकी ११ सामने झाले आहेत. म्हणजेच जवळपास एकचतुर्थाश स्पर्धा झाली आहे. परंतु आतापर्यंतची आकडेवारी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचेच वर्चस्व अधोरेखित करते.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा तीनशे धावसंख्येचा टप्पा ओलांडला गेला आहे. इंग्लंडने आपल्या दोन्ही सामन्यांत गृहमैदानांचा लाभ उठवत तीनशेपल्याड मजल मारली. परंतु या पाचही प्रयत्नांमध्ये सदर संघांचे बहुतेकदा आठ-नऊ फलंदाज बाद झाले आहेत. आतापर्यंतची सामनावीर पुरस्कार विजेत्यांची यादी जरी पाहिली तरी यात तीन फलंदाजांचा आणि सात गोलंदाजांचा समावेश आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतील पहिले सात जण हे वेगवान गोलंदाज आहेत. मॅट हेन्री, मिचेल स्टार्क, ओशाने थॉमस, पॅट कमिन्स, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद आमिर या वेगवान गोलंदाजांना इंग्लिश खेळपट्टय़ांची अचूक नस साधता आलेली आहे. यजुर्वेद्र चहल, मोहम्मद नबी, मोइन अली, अ‍ॅडम झम्पा, इम्रान ताहीर यांच्यासारख्या काही फिरकी गोलंदाजांनाही यश मिळाले आहे.

वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्याने इंग्लंडच्या खेळपट्टय़ांसाठी आखूड टप्प्यांचे चेंडू टाकण्याची रणनीती आखली आहे. यात थॉमस, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, शेल्डन कॉट्रेल आणि कार्लोस ब्रेथवेट यांना यशसुद्धा मिळाले आहे. विंडीजने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा डाव १०५ धावांत संपवला, तर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ७९ धावांत तंबूत धाडला. मग अनुभवी स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन कोल्टर-नाइल यांच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला २८८ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला २०७ धावांत गुंडाळले, तर दुसऱ्या सामन्यात एकापेक्षा एक स्फोटक फलंदाजांचा भरणा असलेल्या वेस्ट इंडिजला ९ बाद २७३ धावसंख्येपर्यंत मर्यादित राखले. म्हणजे प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांवर वर्चस्वाचे हे यश अर्थातच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जाते. स्टार्क, कमिन्स आणि मार्क्स स्टॉइनिस यांनी अचूक टप्प्यावर टिच्चून गोलंदाजी केली.

न्यूझीलंडच्या यशाचे श्रेयसुद्धा गोलंदाजांना जाते. मॅट हेन्री, लॉकी फग्र्युसन, ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्याने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा केला, तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला २४४ धावांत गुंडाळले. यात हेन्रीने श्रीलंकेविरुद्ध तीन आणि बांगलादेशविरुद्ध चार बळी घेत आपली छाप पाडली आहे.

विश्वचषकात आतापर्यंत आठ वेळा संघ सर्व बाद झाले आहेत. श्रीलंकेच्या संघावर दोन्ही सामन्यांत ही नामुष्की ओढवली आहे. शानदार किंवा दणदणीत विजय आतापर्यंत दोनच संघांना मिळवता आले आहेत. इंग्लंडने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी नामोहरम केले, त्यानंतर न्यूझीलंडने श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळवला होता.

ट्वेन्टी-२० क्रिकेटचा परिणाम गेल्या काही वर्षांत कसोटी आणि एकदिवसीय प्रकारांच्या क्रिकेटवर प्रकर्षांने जाणवू लागला आहे. कसोटी सामने पाच दिवसांच्या आत निकाली ठरत आहेत, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा वर्षांव होत आहे. विश्वचषकातील सध्याच्या कामगिरीला ट्वेन्टी-२० क्रिकेटच प्रमुख जबाबदार आहे. फलंदाज धावसंख्या वाढीचे गांभीर्य राखून फटकेबाजी करीत आहेत. त्यामुळेच फलंदाज बाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी गोलंदाजांचे वर्चस्व विश्वचषकावर दिसते आहे.

इंग्लंडमधील खेळपट्टय़ा या फलंदाजांना अनुकूल असल्या तरी इंग्लिश वातावरणात गोलंदाजांचे वर्चस्व नेहमीच असते. गोलंदाजांनी योग्य टप्पा आणि अचूक गोलंदाजी केल्यास त्यांना उत्तम कामगिरी साकारता येऊ शकते. कारण तेथील वातावरणात चेंडू स्विंग होतात. फलंदाजांसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे, असे मी मुळीच म्हणणार नाही. मैदानावर थांबून संयमाने खेळ केल्यास फलंदाजाला मोठी खेळी साकारता येऊ शकते. रोहित शर्माचे यासाठी उदाहरण देता येईल. त्याने नियमित शैलीत बदल करून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक साकारले. परंतु गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने घाई केली आणि बाद झाला. तो जर मैदानावर टिकला असता, तर विंडीजचा संघ सामना जिंकला असता.   – करसन घावरी, भारताचे माजी क्रिकेटपटू