अल जजिराच्या दाव्यामुळे क्रिकेटवर्तुळात खळबळ

२०११ आणि २०१२ दरम्यान जवळपास १५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसामन्यांमध्ये किमान २४ वेळा निकालनिश्चित करण्यात आला असल्याचा दावा अल जजिरा या वृत्तवाहिनीने केल्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटवर्तुळात खळबळ उडाली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळातील भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे म्हणत या वृत्तवाहिनीकडे व्हिडियो चित्रण मागितले असून त्यांनी हे चित्रण आयसीसीला देण्यास नकार दिला आहे.

इंग्लंडच्या काही खेळाडूंनी सात सामन्यांमध्ये, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पाच सामन्यांमध्ये तर पाकिस्तानच्या खेळाडूंनी तीन सामन्यांमध्ये निकालनिश्चिती केल्याचा दावा या वाहिनीने केला आहे. खेळातील ठरावीक ठिकाणी निकालनिश्चिती करण्यात आली असून त्याचा सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही, असेही या वाहिनीने म्हटले आहे.

आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे महाव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल यांनी सांगितले की, ‘‘वाहिनीने इंटरपोल किंवा अन्य पोलीस यंत्रणांच्या मदतीने हे चित्रण आम्हाला दिले तर दोषींवर कारवाई करण्यात मदत होईल. आम्ही हे आरोप अतिशय गंभीरतेने घेत असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. क्रिकेटमधून भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी आमच्याकडे पूर्वीपेक्षा अधिक चांगली यंत्रणा उपलब्ध आहे.’’