चीनच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे सायना नेहवालला इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी अग्रमानांकन देण्यात आले आहे. २३ ते २८ एप्रिल या कालावधीत नवी दिल्ली येथे ही स्पर्धा होणार आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती सायनाची सलामीची लढत इंडोनेशियाच्या बेलायट्रिक्स मनुपुटीशी होणार आहे. सायनाने यंदा झालेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत मनुपुटीचा सहज पराभव केला होता. दोन फेऱ्यांपर्यंत सायनाला आगेकूच करण्यात अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. मात्र भारताचीच आठवी मानांकित पी. व्ही. सिंधू सायनासाठी प्रबळ आव्हान ठरू शकते.
२०१०मध्ये सायनाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदाच्या वर्षी सिंधूवर मात केल्यास सायनाला उपांत्य फेरीत थायलंडच्या रत्नाचोक इनथॅनॉनचे आव्हान तिच्यासमोर असणार आहे. तिसऱ्या मानांकित रत्नाचोकने ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत सायनाला उपांत्य फेरीत नमवले होते. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गट्टा मुंबईकर प्राजक्ता सावंतच्या साथीने तर अश्विनी पोनप्पा प्रज्ञा गद्रेच्या साथीने खेळणार आहे.
दरम्यान, पुरुष गटात पी. कश्यपला स्पध्रेत खडतर आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असणाऱ्या कश्यपची सलामीची लढत तौफिक हिदायतशी होणार आहे. कश्यपने हिदायतला पराभूत केल्यास स्पर्धेतील त्याचा प्रवास सोपा होऊ शकतो. उपांत्यपूर्व फेरीत कश्यपची गाठ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईशी होऊ शकते.
या दोघांव्यतिरिक्त पुरुष गटात आरएमव्ही गुरुसाईदत्त, अजय जयराम, आनंद पवार, सौरभ वर्मा आणि बी.साईप्रणिथ हे सहभागी होत आहेत. गुरुसाईदत्तची सलामीची लढत टॉमी सुगिर्तोशी होणार आहे. जयरामचा मुकाबला जपानच्या शो सासाकीशी होणार आहे. आनंद पवार, सौरभ वर्मा आणि बी.साईप्रणीथला पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात अडथळा येऊ नये.