News Flash

EXCLUSIVE : …म्हणून भारतीय संघाने चौथा सामनाही गमावला!

मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या वृत्तीचे दर्शन कॅनबेरा स्टेडियमवर भारताने पुन्हा एकदा घडविले.

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग चौथा पराभव.

गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका याआधीच गमावली होती. पण फलंदाजांनी उरली सुरली कसर भरून काढत चौथा सामनाही यजमानांना जणू आंदण दिला. ऑस्ट्रेलियाच्या ३४९ धावांच्या कडव्या आव्हानाला चोख प्रत्त्युत्तर देत कोहली आणि धवन यांनी दमदार शतके ठोकली. मात्र, इतर फलंदाजांनी सुमार खेळ करत मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या वृत्तीचे दर्शन कॅनबेरा स्टेडियमवर पुन्हा एकदा घडविले. भारताच्या पराभवाची कारणे..

* कर्णधाराकडून निराशा-
ऑस्ट्रेलियाने कडवे आव्हान दिले असतानाही भारताच्या फलंदाजांनी कोणताही दबाव निर्माण होऊ न देता आक्रमक सुरूवात केली होती. रोहित शर्माने २१ चेंडूत ४१ धावा ठोकल्या, तर धवन आणि कोहली यांच्या द्विशतकी भागीदारीमुळे सामन्यावर भारताने पकड निर्माण केली होती. पण धवन बाद झाल्यानंतर रहाणे किंवा गुरूकिरत मान मैदानात उतरणे अपेक्षित असताना महेंद्रसिंग धोनीने मैदानाचा ताबा घेतला. धोनीचा हा निर्णय अयोग्य ठरला. धोनी एकही धाव न करता यष्टीरक्षक करवी झेलबाद होऊन माघारी परतला.

* कोहलीची विकेट-
धोनी बाद होऊनही कोहली मैदानात असल्याने संघाच्या विजयी आशा कायम होत्या. कोहलीने आक्रमक फलंदाजी करत ८४ चेंडूत शतक ठोकले. पण धोनी बाद झाल्यानंतर संयमी खेळीची आवश्यकता असताना कोहली देखील धोनीपाठोपाठ माघारी परतला. खरतर कोहली बाद झाला तेव्हाच सामना संपला होता.

* मॅक्सवेलची शेवटच्या षटकांतील फटकेबाजी-
अरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार फलंदाजी केली असली तरी शेवटच्या षटकांत ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला ३४८ धावांचा डोंगर उभारता आला. शेवटच्या षटकांत इशांत शर्माने अगदीच सुमार गोलंदाजी केली. याचा फायदा उचलत मॅक्सवेलने २० चेंडूत ४१ धावा कुटल्या.

* भुवनेश्वर निष्प्रभ-
संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाजी सुमार ठरली. चौथ्या सामन्यात भुवनेश्वरच्या गोलंदाजीने तर पुरती निराशा केली. भुवनेश्वरने ८ षटकांत एकही विकेट न घेता तब्बल ६९ धावा दिल्या. इशांतनेही दहा षटकांत ७७ धावा दिल्या, पण त्याने ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. अखेरच्या षटकांत इशांतनेही सुमार गोलंदाजी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2016 5:12 pm

Web Title: top reasons why india lost
टॅग : Indvsaus
Next Stories
1 भारताची हाराकिरी, चौथा सामनाही ऑस्ट्रेलियाच्या खिशात
2 राफेल नदालचे आव्हान सलामीच्या लढतीतच संपुष्टात; द्वितीय मानांकित सिमोन हालेपही पराभूत
3 भ्रष्टाचार रोखण्यासाठी पारदर्शकता आवश्यक – मरे
Just Now!
X