भारत इंग्लंड दरम्यानची कसोटी मालिका एक ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या भारताने याआधीच्या इंग्लंडच्या दौऱ्यातील कसोटी मालिका 3-1 अशा फरकानं गमावली होती. त्या मानहानीचा डाग धुवून काढायचा असेल तर भारतीय फलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. भारत सात स्पेशालिस्ट फलंदाजांना घेऊन मैदानात उतरत असून केएल राहूल, करूण नायर व रिषभ पंत इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी खेळणार आहेत.
याआधी इंग्लंडमध्ये खेळलेल्या सहा फलंदाजांची सरासरी व कामगिरी पुढीलप्रमाणे:

सहावं स्थान – सगळ्यात तळाला आहे भारताचा कर्णधार विराट कोहली</p>

गेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट पाच कसोटी सामन्यांमध्ये 10 डाव खेळला परंतु त्याला 13.4 च्या सरासरीनं अवघ्या 134 धावा करता आल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती 39. सहा फलंदाजांमध्ये सगळ्यात खराब सरासरी विराटचीच आहे. जेम्स अँडरसननं त्यावेळी कोहलीला चार वेळा बाद केलं होतं.
अर्थात, आता परिस्थिती खूप बदलली असून कोहलीनं त्यानंतर सगळीकडे धावांचा रतीब घातलेला आहे. विराट खेळला तर भारताच्या जिंकायच्या आशा वाढतात हे महत्त्वाचं.

पाचवं स्थान – विराटपेक्षा बरी सरासरी आहे शिखर धवनची
नवीन चेंडूवर शिखर हडबडतो हे सर्वश्रूत आहे. परंतु तो टिकला तर मात्र कुठल्याही गोलंदाजांचा समाचार घेतो हे ही खरं आहे. आधीच्या दौऱ्यामध्ये शिखरनं 20.33 च्या सरासरीनं 122 धावा केल्या होत्या. या दौऱ्यामध्ये पहिल्या कसोटीत शिखरला खेळवलं जातं की ऐन भरात असलेल्या के. एल. राहूलला संधी मिळते हे ही बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चौथं स्थान – सलामीचा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून चेतेश्वर पुजारा ओळखला जात असला तरी 2014 मधला इंग्लंडचा दौरा त्याला खराब गेला. अवघ्या 22.2 च्या सरासरीनं त्याला 222 धावा करता आल्या, ज्यामध्ये केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे.
द्रविडसारखा तंत्रशुद्ध फलंदाज अशी ओळख पक्की करण्यासाठी हा दौरा त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

तिसरं स्थान – गेल्या दौऱ्यात दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्सवर शतक झळकावलेल्या अजिंक्य रहाणेला नंतर मात्र फारशी चमक दाखवता आली नाही. आणखी दोन अर्धशतकं त्यानं झळकावली आणि 33.22 च्या सरासरीनं अजिंक्यनं त्यावेळी 299 धावा केल्या होत्या. यावेळी त्याच्याकडून जास्त अपेक्षा असणार आहेत. ही कामगिरी वाईट नसली तरी त्याच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय देणारी नाही. भारताची धावसंख्या मधल्या फळीवर अवलंबून असून त्यामध्ये अजिंक्यला मोलाची भूमिका बजावावी लागेल.

 

दुसरं स्थान – 40.2 च्या सरासरीनं मुरली विजयनं 2014च्या त्या दौऱ्यात सर्वाधिक म्हणजे 402 धावा केल्या होत्या.
पहिल्या सामन्यात 146 धावा फटकावणाऱ्या विजयनं नंतर दोन अर्धशतकं झऴकावली होती. लॉर्ड्सवरील विजयामध्ये त्याच्या 95 धावांचा मोलाचा वाटा होता. कसोटी विजयासाठी मुरली विजयच्या दमदार सलामीवर भारताची मदार असणार आहे.

पहिलं स्थान – गुणी फलंदाज व निपुण यष्टिरक्षक दिनेश कार्तिक<br />2007च्या इंग्लंडच्या दौऱ्यात भारतानं कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर अद्याप भारतानं इंग्लंडमध्ये मालिका जिंकलेली नाही. या दौऱ्यात सलामीला येत कार्तिकनं तीन अर्धशतकं झळकावली होती व 43.83च्या सरासरीनं 263 धावा केल्या. इंग्लंडमध्ये सलामीला येऊन 43ची सरासरी राखणं हे वैशिष्ट्य मानलं जातं. अर्थात यावेळी तो सलामीला येईल की त्याला मदल्या फळीत खेळवण्यात येईल हे बघावं लागेल.