आशियाई बॅडमिंटन स्पर्धेला बुधवारपासून सुरूवात होत असून भारताच्या आशा सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्यावर आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे.
पायाच्या दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर सायनाने स्वीस, इंडिया ओपन व मलेशियन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिने सिंगापूर ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती. येथे तिला पाचवे मानांकन मिळाले असून, पहिल्या सामन्यात तिला इंडोनेशियाच्या फित्रियानीशी खेळावे लागणार आहे.
सिंधूला जागतिक क्रमवारीत दहावे स्थान असले तरी यंदा अनेक स्पर्धामध्ये तिला अपेक्षेइतके यश मिळू शकलेले नाही. स्वीस, इंडिया ओपन, मलेशियन खुल्या व चीन मास्टर्स स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच आव्हान राखता आले होते. तिला पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या मारिया फेबे कुसुमास्तुतीशी खेळावे लागणार आहे.
पुरुषांच्या एकेरीत किदम्बी श्रीकांतला कोरियाच्या ली दोंग कुआन याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. महिलांच्या दुहेरीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांची कोरियाच्या चांग येईनो व ली सोहेई यांच्याशी, तर पुरुषांच्या दुहेरीत मनू अत्री व बी. सुमेध रेड्डी यांची जपानच्या हिरोयुकी एन्डो व केनिची हायाकावा यांच्याशी गाठ पडणार आहे.