करोना विषाणू संसर्गामुळे फ्रान्समध्ये होणारी ‘टूर डी फ्रान्स’ ही जगातील प्रसिद्ध सायकल शर्यत यंदा २७ जूनऐवजी २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. जर ‘टूर डी फ्रान्स’ ही सायकल शर्यत रद्द झाली असती तर सायकलिंग क्षेत्राला मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार होते.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी जुलैच्या मध्यापर्यंत गर्दी खेचणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना मज्जाव घातला आहे. या स्थितीत ‘टूर डी फ्रान्स’चे नियोजित वेळापत्रकानुसार आयोजन होणे कठीण दिसत होते. जर ही सायकल शर्यत रद्द झाली असती तर या स्पर्धेशी संबंधित प्रत्येकाला मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला असता. मात्र आता ‘टूर डी फ्रान्स’च्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याने आयोजकांसह या स्पर्धेशी संबंधित सर्वानाच दिलासा मिळाला आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक शहरात लाखोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असतात, ही बाबदेखील विचारात घेण्यात आली. सायकल शर्यतींमध्ये ‘टूर डी फ्रान्स’ला मिळणारा प्रायोजक वर्ग सर्वात मोठा आहे. परिणामी या सर्व बाबींचादेखील स्पर्धा लांबणीवर टाकताना विचार करण्यात आला.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि युरो चषक फुटबॉल स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर ‘टूर डी फ्रान्स’ या एकमेव मोठय़ा जागतिक स्पर्धेबाबतचा निर्णय होणे बाकी होते. ही स्पर्धा ऑगस्टमध्ये होणार असल्याने स्पेनमध्ये १४ ऑगस्ट ते ६ सस्प्टेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘ला व्यूएल्टा ए इस्पेना’ या तीन आठवडय़ांच्या सायकल शर्यतीचे वेळापत्रक नव्याने आखावे लागणार आहे.