बांगलादेशच्या दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेटसाठी हा हंगाम भरगच्च असाच असणार आहे. डिसेंबर महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेविषयीही चर्चा होत आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.
बांगलादेश दौऱ्यानंतर भारतीय संघ जुलैमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेला जाणार आहे. मग दक्षिण आफ्रिकेचा संघ सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत भारत दौऱ्यावर चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्धची बहुप्रतीक्षित मालिका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी जानेवारी २०१६मध्ये भारतात येईल. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात श्रीलंकेचा संघ तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येईल. त्यानंतर आशिया चषक स्पर्धा होईल. मग ११ मार्च ते ३ एप्रिल, २०१६ या कालखंडात भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे.

प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरू
विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसह डंकन फ्लेचर यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. परंतु भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘प्रशिक्षकपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकेल, अशा प्रशिक्षकाकडे आम्ही संघ सुपूर्द करणार आहोत.’’