‘कबड्डी : कालची आणि आजची’ या चर्चेत मान्यवरांचा सूर

सर्वच नेते शरद पवार यांच्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील कुशल संघटक होऊ शकत नाहीत. संघटनेला आíथक चणचण भासू नये म्हणून राजकीय व्यक्तींची आवश्यकता आहे, पण त्यांनी खेळाच्या निवडीत हस्तक्षेप करू नये. खेळाच्या नियंत्रणासाठी खेळाडू जास्त प्रमाणात असावेत, जेणेकरून चांगल्या खेळाडूंची दखल घेतली जाईल, असे मत प्रशिक्षक जीवन पैलकर यांनी व्यक्त केले.

रविवारी नलिनी फडणीस, मृदुला वैद्य-मडकईकर, रघुनाथ नलावडे आणि मनोहर इंदुलकर या कबड्डी क्षेत्रातील अज्ञात ताऱ्यांना ओम कबड्डी प्रबोधिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आयोजित केलेल्या ‘कबड्डी : कालची आणि आजची’ या चर्चासत्रात मुंबईत खास कबड्डीकरिता क्रीडांगण का नाही, या प्रश्नाला उत्तर देताना आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले की, ‘‘श्रमिक जिमखान्याचा त्या दृष्टीने विचार चालू आहे. तसेच या भागात कबड्डीसाठी मी आणखी दोन मदाने उपलब्ध करून देणार आहे.’’

प्रो कबड्डी लीगच्या आव्हानामुळे व्यावसायिक संघांची संख्या रोडावेल का, याबाबत इंदुलकर म्हणाले, ‘‘पूर्वी वरळी-प्रभादेवी-लोअर परेल-परळ हा गिरणगाव म्हणून ओळखला जायचा. या गिरण्यांचे संघदेखील तगडय़ा तयारीचे होते. यातूनच मोठय़ा बँकांना व कंपन्यांना उत्तम खेळाडू उपलब्ध होत. त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळे. आज सर्वत्र खेळाडू भरती प्रक्रिया बंद आहे. काही प्रमाणात हंगामी स्वरूपात खेळाडू घेतले जातात. त्यापेक्षा चांगला खेळ केला आणि लीगमध्ये मोठी बोली लागली तर, जीवनाची उत्तम कमाई होईल. म्हणून या प्रो-कबड्डीची तयारी करण्याकरिता खेळाडू व्यावसायिक संघाकडून स्पर्धा खेळण्यापेक्षा विश्रांती घेणे पसंत करतात. त्यामुळे दिवसेंदिवस व्यावसायिक संघांची संख्या कमी होत चालली आहे.’’

महिलांचे व्यावसायिक संघ मर्यादित राहिले, याबाबत अर्जुन पुरस्कार विजेत्या माया आक्रे-मेहेर म्हणाल्या, ‘‘महिला खेळाडू जास्त र्वष खेळू शकत नाहीत. लग्नानंतर त्यांच्या अडचणी वाढत जातात. प्रत्येक वर्षी महिला खेळाडू भरती करणे शक्य नसल्यामुळे ही संख्या कमी आहे.’’

‘‘हिंद करंडक शालेय स्पध्रेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शालेय जीवनापासून स्पर्धात्मक खेळ खेळायला मिळाल्यामुळे भविष्यात मोठय़ा स्पध्रेलादेखील ते निडर होऊन खेळतात. कोणताही खेळ कमी वयात खेळावयास सुरुवात केल्यामुळे ते लवकरच त्यात प्रावीण्य मिळवतात. त्यामुळे भविष्यात आपल्याला उत्तम खेळाडू हवे असतील तर त्यांना शालेय जीवनापासून शोधायला हवे,’’ असे नलिनी फडणीस यांनी सांगितले.