* टॅक्सीचालकाने उडविले
भारताच्या माजी सायकलपटू आणि सध्याच्या भारतीय राष्ट्रीय सायकलिंग संघाच्या प्रशिक्षिका रुमा चॅटर्जी, नोएडा एक्स्प्रेस रस्त्यावर मोटारसायकलवरून सायकलपटूंचा सराव घेत असताना रुमा चॅटर्जींच्या मोटारसायकलला एका टॅक्सीचालकाने धडक दिली व यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
५१ वर्षीय रुमा चॅटर्जी इतर तीन प्रशिक्षिकांसोबत भारताच्या सायकलिंग संघाचा सराव घेत होत्या. त्यावेळी एका भरधाव ‘मेरू प्लस टॅक्सी’ सेवेच्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.
” मला माझ्या मोटारसायकलच्या आरशातून भरधाव वेगात मागून कार येताना दिसली होती. परंतु, काही सेकंदात ती कार रुमा चटर्जींच्या मोटारसायकला धडकली.” असे घटनेचे प्रत्यक्षदर्शी भारतीय फेडरेशनचे सदस्य व प्रशिक्षक भीम सिंग दाहीया यांनी सांगितले.
” मागून येणारी टॅक्सी इतक्या भरधाव वेगात मोटारसायकलवर धडकली की, रुमा चॅटर्जींची मोटारसायकल जवळपास ५० मीटर दूरवर फेकली गेली व त्या टॅक्सीच्या समोरील काचेवर जाऊन आदळल्या. कोणी प्रतिसाद देण्यापूर्वीच, टॅक्सीचालक तसाच भरधाव वेगात फरार झाला. आम्ही रुमाजींकडे धाव घेतली, परंतु त्यावेळी त्या प्रतिसाद देत नव्हत्या. आम्ही लगेच त्यांना सेक्टर २७ येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले” असंही दाहीया पुढे म्हणाले.