न्यूझीलंड आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेला आजपासून ऑकलंडच्या मैदानावर सुरुवात झाली. मात्र पहिल्याच कसोटीमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या जलद गोलंदाजांसमोर नांगी टाकल्याचे दिसून आले. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि टिम साउथी या जोडगोळीने इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या ५८ धावांमध्ये तंबूत परतला. एका क्षणी इंग्लंडची स्थिती २७ धावांवर ९ गडी बाद अशी होती. मात्र क्रेग ओवरटन थोडा वेळ मैदानात तग धरत ३३ धावांची खेळी केल्याने सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याची नामुष्की इंग्लंडला टाळता आली हीच काय ती पाहुण्या संघासाठी जमेची बाजू ठरली.

बोल्ट आणि साउथीच्या वेगवान गोलंदाजीबरोबरच पीचवरील बाऊन्ससमोर इंग्लंडचा संघ अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही. बोल्टने सहा तर साउथीने इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत परत पाठवले. इंग्लंडच्या संपूर्ण संघाला बाद करण्यासाठी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना केवळ २०.४ षटके लागली. दोन कसोटी समान्यांच्या मालिकेत अशी दमदार सुरुवात करुन न्यूझीलंडने पहिल्याच दिवसापासून वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे.

सामन्यामध्ये इंग्लंडची सुरुवातच अडखळती झाली. संघाची धावसंख्या सहावर असतानाच अॅलिस्टर कूकला ट्रेंटने बाद केले. त्यानंतर संघाचा कर्णधार जो रुट भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर संघाची धावसंख्या १६वर असताना डेव्हीड मिलान, १८ वर असताना मार्क स्टोनमन, बेन स्ट्रोक्स आणि जोनी ब्रेनस्ट्रो बाद झाले. त्यानंतर संघाची धावसंख्या २३ वर असताना क्रिस वोक्स आणि मोईन आली बाद झाले. त्यानंतर २७ धावांवर असताना स्टुअर्ट ब्रॉड बाद झाला आणि ५८ धावांवर असताना जेम्स अॅण्डर्सन बाद झाला.

योगायोग

२७ धावांवर ९ गडी तंबूत परतले असताना कसोटी क्रिकेटमध्ये एका डावातील सर्वात कमी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम इंग्लंडच्या नावे होता होता राहिला असेच म्हणावे लागेल. कसोटीमध्ये सर्वात कमी सांघिक धावसंख्या २६ आहे. विशेष म्हणजे १९५५ सालचा हा विक्रम याच ऑकलंडच्या मैदानात झाला होता. २५ मार्च १९५५ रोजी इंग्लंडच्या संघाने यजमान न्यूझीलंड संघाला अवघ्या २६ धावांवर बाद केले होते.

पहिली पिंक बॉल टेस्ट

हा सामना अन्य एका कारणामुळे महत्वाचा आहे. गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर करुन खेळवण्यात येणारी ही पाहिलीच कसोटी आहे.

कसोटीमधील सर्वात कमी धावसंख्या

धावसंख्या संघ विरुद्ध मैदान तारीख

२६ न्यूझीलंड इंग्लंड ऑकलंड २५ मार्च १९५५

३० द. आफ्रिका इंग्लंड बर्मिंगम १४ जून १९२४

३० द. आफ्रिका इंग्लंड पोर्ट एलिझाबेट १३ फेब्रु १८९६

३५ द. आफ्रिका इंग्लंड केप टाऊन १ एप्रिल १८९९

३६ द. आफ्रिका ऑस्ट्रेलिया मेलबर्न १२ फेब्रु १९३२

३६ ऑस्ट्रेलिया इंग्लंड बर्मिंगम २९ मे १९०२

४२ न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया वेलिंग्टन २९ मार्च १९४६

४२ ऑस्ट्रेलिया इंग्लंड सिडनी १० फेब्रु १९८८

४२ भारत इंग्लंड लंडन २० जून १९७४

४३ द. आफ्रिका इंग्लंड केप टाऊन २५ मार्च १८८९