ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचं आयोजन आयसीसीने पुढे ढकलल्यानंतर, आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयसमोरचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाची स्पर्धा बीसीसीआय युएईमध्ये भरवण्याच्या तयारीत आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा बीसीसीआयने केली नसली तरीही येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच माजी विजेते मुंबई इंडियन्ससमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. संघाचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट या हंगामात खेळण्याबद्दल साशंक आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या ट्रेंट बोल्टला मुंबई इंडियन्सने Player Transfer Window मार्फत मुंबईत घेतलं होतं.

“स्पर्धेत सहभागी व्हायचं की नाही याबद्दल मी योग्य व्यक्तींशी बोलून माझ्यासाठी आणि माझ्या खेळासाठी योग्य असेल तो निर्णय घेईन. मला माझ्या परिवाराचाही विचार करायचा आहे. माझ्यासोबत न्यूझीलंडमधले माझे काही सहकारीही या स्पर्धेत सहभाही होणार आहेत. पण सहभागी व्हायचं की नाही याबद्दल येणारा काळ याबद्दल अधिक स्पष्ट सांगेल. मध्यंतरी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. पण सध्या प्रत्येक आठवड्याला परिस्थिती बदलते आहे. त्यामुळे मी थोडावेळ थांबून मग निर्णय घेईन.” न्यूझीलंडमधील One News या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत बोल्टने माहिती दिली.

बोल्ट व्यतिरीक्त मिचेल मॅक्लेनघन हा न्यूझीलंडचा खेळाडूही मुंबईकडून खेळतो. यासोबतच जिमी निशम, लॉकी फर्ग्युसन, केन विल्यमसन, मिचेल सँटनर हे न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएलमध्ये विविध संघांचं प्रतिनिधीत्व करतात. मलाही बाहेर जाऊन खेळायचं आहे. फार काळ घरात बसून राहणं कोणत्याही खेळाडूला आवडत नाही. पण सध्याच्या परिस्थितीत निर्णय घेण्याआधी विचार करावा लागणार असल्याचं बोल्टने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – IPL आयोजनाबद्दल गव्हर्निंग काऊन्सिल अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले…