चॅम्पियन्स करंडक जिंकल्यामुळे उंचावलेला आत्मविश्वास कॅरेबियन भूमीवरील तिरंगी स्पर्धेतील सलग दोन पराभवांनंतर भारतीय संघाने गमावलेला आहे. आता या स्पर्धेत भारताला जर अंतिम फेरी गाठायची असेल तर शुक्रवारी होणारा वेस्ट इंडिजचा सामना त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ असाच असेल. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त झाल्याने हंगामी कर्णधार विराट कोहलीची ही अग्निपरीक्षाच असेल.
या स्पर्धेत भारताला अजूनही चांगली सलामी मिळालेली नाही. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना आतापर्यंत संघाला दणकेबाज सुरुवात करून देता आलेली नाही. रोहितच्या नावावर एक अर्धशतक जमा असले तरी त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याचबरोबर भारताच्या मधल्या फळीलाही चमक दाखवता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये एकाही गोलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने भारतापुढे प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
दोन विजयांसह यजमान वेस्ट इंडिजच्या संघाने जवळपास अंतिम फेरीचा दरवाजा ठोठावलेला आहे. ख्रिस गेलबरोबरच दुसरा सलामीवीर जॉन्सन चार्ल्स यालाही चांगलाच सूर गवसलेला आहे. पण मधल्या फळीत डॅरेन ब्राव्होचा अपवाद वगळता एकही खेळाडू फॉर्मात नाही. गोलंदाजीमध्ये रवी रामपॉल नसल्याने त्यांचा वेगवान मारा थंडावण्याची शक्यता आहे, पण फिरकीपटू सुनील नरिन मात्र चांगल्या फॉर्मात आहे.
वेळ : रात्री ७.०० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट व टेन स्पोर्ट्स वाहिनीवर.