भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाचे मत

मुंबई : विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्येच आयोजित करण्यात आलेल्या तिरंगी मालिकेमुळे संघबांधणी करण्यासाठी फार मोलाचे साहाय्य होईल, असा विश्वास भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधनाने व्यक्त केला.

‘पॉवर फिटनेस कलेक्शन’ या तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी स्मृती मुंबईत उपस्थित होती. २१ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये तिरंगी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या स्पर्धाद्वारे विश्वचषकासाठी संघबांधणी करण्यात आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यात फायदा होईल, असे २३ वर्षीय स्मृती म्हणाली.

‘‘विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय गेल्या वर्षभरात भारताने ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्याने विश्वचषकाची तयारी सुरळीतपणे सुरू आहे, असे मला वाटते,’’ असे स्मृती म्हणाली.

‘‘यावेळी विश्वचषकाच्या जवळपास एका महिन्यापूर्वीच आम्ही ऑस्ट्रेलियात रवाना होणार आहोत. त्यामुळे या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. त्याचप्रमाणे तिंरगी स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यास आम्हाला विश्वचषकापूर्वी संघातील प्रत्येक स्थानावर कोणता खेळाडू योग्य आहे, याचीही जाणीव होईल. गेली अनेक वर्षे बिग बॅश लीगमध्ये खेळल्याने मलाही वैयक्तिक फायदा होईल,’’ असेही स्मृतीने सांगितले.

२०१७च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवली. परंतु आताचा संघ त्यादृष्टय़ा सक्षम आहे का, असे विचारले असता स्मृतीने होकार दर्शवला. ‘‘२०१७च्या संघातील अनेक खेळाडूंना उपांत्य आणि अंतिम फेरीतील दडपण कसे हाताळायचे, याचा अनुभव नव्हता. मात्र आता संघाची कामगिरी उत्तम झाली अथवा वाईट, तरी आम्ही त्याविषयी अधिक चर्चा न करता आगामी आव्हानांवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे मानसिकदृष्टय़ा खेळाडूंच्या विचारसरणीत निश्चितच २०-३० टक्के सुधारणा झाली आहे,’’ असे ६६ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव असलेल्या स्मृतीने सांगितले.

पुरुषांप्रमाणेच वार्षिक कराराची अपेक्षा करणे चुकीचे!

* ‘बीसीसीआय’ने पुरुष क्रिकेटपटूंसाठी जाहीर केलेल्या वार्षिक कराराप्रणाणेच महिलांनाही सारखेच मानधन मिळावे, अशी अपेक्षा करणे अयोग्य असल्याचे मत स्मृतीने व्यक्त केले.

* ‘‘साहजिकच क्रिकेटला पुरुषांच्या सामन्यांद्वारे मोठय़ा प्रमाणावर नफा मिळतो, त्यामुळे महिलांनाही त्यांच्याप्रमाणेच वार्षिक कराराइतकी रक्कम मिळावी, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. परंतु आम्ही याकडे अधिक लक्ष न देता स्वत:च्या कामगिरीद्वारे भारताला विजय मिळवून देण्याला अधिक प्राधान्य देतो,’’ असे स्मृती म्हणाली.

युवा खेळाडूंना उत्तम संधी!

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंचा भरणा असून वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंची संख्या अधिक आहे. त्यामुळे विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत हे धोकादायक ठरेल का, याविषयी विचारले असता स्मृती म्हणाली, ‘‘माझ्या मते फिरकी गोलंदाजी ही भारताची खरी ताकद असल्यानेच संघ व्यवस्थापनाने त्यांच्यावर भरवसा दर्शवला आहे. त्याशिवाय युवा खेळाडू मोठय़ा स्पर्धेतूनच शिकतात. त्यामुळे या विश्वचषकात स्वत:चे नाव कमावण्याची त्यांना उत्तम संधी असून त्यांना अपयश जरी आले, तरी भविष्यात त्यांना या कामगिरीद्वारे नक्कीच प्रेरणा मिळेल.’’