26 February 2021

News Flash

एल दिएगो..

इटलीतील बडय़ा क्लबांविरुद्ध नापोलीने मिळवलेले अभूतपूर्व यश सर्वस्वी मॅराडोनाचेच होते.

|| सिद्धार्थ खांडेकर

पाच फूट, पाच इंच उंचीचा वामनमूर्ती दिएगो मॅराडोना परवा रात्री ब्युनॉस आयर्सजवळ चिरंतन विसावला आणि एक युगान्त झाला. त्याच्याकडे ना उंच बलदंड शरीरयष्टी होती, ना रूढार्थाने चिमुकली चण. बटुकमूर्ती असूनही स्नायूसौष्ठवामुळे तो गुटगुटीत होता. त्यामुळे आक्र मक (स्ट्रायकर) होण्यात अडचणी आणि बचावपटू (डिफेंडर) होण्यासही अपात्र. तरीही कमालीच्या वेगाने पळायचा. त्याच्या पायांपेक्षा वेगवान आणि तल्लख त्याची बुद्धी होती. फुटबॉल हा निव्वळ शारीरिक खेळ नाही. इतर बहुतेक खेळांप्रमाणे त्याला बौद्धिक आयामही आहेत. मॅराडोनाच्या या गुणाची चर्चा फारशी झालेली नाही. अर्जेटिनाइतकाच इटलीतील नापोली क्लबकडूनही मॅराडोनाने कौशल्य आणि नेतृत्व दाखवलेले आहे. इटलीतील बडय़ा क्लबांविरुद्ध नापोलीने मिळवलेले अभूतपूर्व यश सर्वस्वी मॅराडोनाचेच होते.

अर्थात युरोप-लॅटिन अमेरिकेबाहेर त्याची ओळख आणि कीर्ती प्रस्थापित झाली, ती १९८६ विश्वचषक स्पर्धेमुळेच. या स्पर्धेत त्याने पाच गोल झळकावले आणि पाच गोलांसाठी पासेस पुरवले. ज्या बहुचर्चित सामन्यासाठी मॅराडोना ओळखला जातो, तो इंग्लंडविरुद्धचा उपान्त्यपूर्व फेरीचा सामना जिज्ञासूंनी आजही यू-टय़ूबवर बघावा. त्या सामन्यातील पहिला गोल ५०व्या मिनिटाला नोंदवला गेला. तोच हा ‘हँड ऑफ गॉड’ गोल. त्यानंतर चारच मिनिटांनी मॅराडोनाने अर्जेटिनाच्या हाफमधून कूच करत, दोन इंग्लिश मध्यरक्षक, तीन बचावपटू आणि गोलरक्षक पीटर शिल्टनला चकवून अफलातून गोल केला, तोही तितकाच गाजला. त्या सामन्यातील मॅराडोनाच्या ‘रडीच्या गोल’वर व्यक्त होण्यापूर्वी सामना नीट पाहावा. ९व्या मिनिटाला, ३२व्या मिनिटाला, ४०व्या मिनिटाला मॅराडोनाला ज्या भयानक पद्धतीने इंग्लिश फुटबॉलपटू पाडत होते, ते सध्याच्या काळातील कोणताही रेफरी सहन करणार नाही, पण मॅराडोनासाठी असे अडथळे आणि दुखापती हे जणू प्राक्तन होते. कमी उंची आणि मजबूत अंगकाठीमुळे त्याला अनुकूल गुरुत्वमध्य लाभला, तसाच प्रचंड वेगही आत्मसात करता आला. उंच तगडय़ा युरोपियनांचा वेग त्याच्यासमोर हास्यास्पद ठरायचा. त्याला रोखण्यासाठी पाय आडवा घालून पाडणे किंवा मागून हाताने ढकलणे असे दोनच मार्ग अल्पकौशल्य मंडळींसमोर उपलब्ध असायचे. त्या स्पर्धेत इटली, इंग्लंड, बेल्जियम, (पश्चिम) जर्मनी या संघांतील बहुतांनी तेच निवडले. टॅकलिंगबाबत कडक नियमांचा अभाव आणि बरेचसे उदारमतवादी रेफरी यामुळे मॅराडोनासाठी अनेकदा मैदानावरील ९० मिनिटे असह्य़ ठरायची. मॅराडोनाच्या जिवावर कमावलेले अर्जेटिनाचे १९८६ मधील जगज्जेतेपद या दृष्टीने तपासले पाहिजे.

मॅराडोनाकडे निव्वळ ड्रिब्लिंग कौशल्य नव्हते. त्याच्याकडे फुटबॉलमध्ये व्यूह रचण्यासाठी आणि तो अमलात आणण्यासाठी आवश्यक अत्यंत तल्लख बुद्धी होती. एकदा आपण मैदानावर पळू लागलो, की बाकीचे सावध होऊन वाटेल त्या मार्गाने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा जे करायचे ते झटक्यात. यापेक्षा वेगळा पर्याय त्याच्यासमोरही नव्हताच म्हणा. फुटबॉल मैदानावर प्रतिस्पध्र्याच्या तटबंदीत फटी किंवा जागा तो अचूक हेरायचा. त्याची ही सहज प्रवृत्ती १९८६ मधील स्पर्धेत परमोच्च बिंदूवर होती, असे म्हणता येईल. त्याचा प्रत्येक गोल महत्त्वाच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध (इटली, इंग्लंड, बेल्जियम) नोंदवला गेला. अंतिम सामन्यात दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत असताना आणि सामना संपण्यास आठ मिनिटे शिल्लक असताना मॅराडोनाने अर्जेटिनाच्या होर्गे बुरुशागाला अप्रतिम पास पुरवला. असे पासेस हे मॅराडोनाच्या ड्रिब्लिंग कौशल्याइतकेच अभूतपूर्व होते. १९९०च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये मॅराडोनाच्या ड्रिब्लिंगची जादू फारशी दिसलीच नाही, परंतु दुसऱ्या फेरीत ब्राझीलविरुद्ध मॅराडोनाने क्लॉडियो कॅनिजियाला पुरवलेला पास आजही फुटबॉल रसिकांच्या स्मरणात असेल. सामन्यातील एकमेव गोल हा त्या पासवर झाला.

नापोलीकडून खेळताना त्याने अनेकदा प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला बेसावध गाठून त्याच्या डोक्यावरून लांबून पल्लेदार गोल केलेले आहेत. फ्री-किक आणि कॉर्नर-किक बहुतेकदा मॅराडोनाच घ्यायचा. तो जोवर मैदानात खेळला, तोपर्यंत त्याचे नेतृत्व वादातीत होते. त्याला कोणीही आव्हान दिले नाही. १९८०च्या दशकातील अस्वस्थ अर्जेटिनासाठी तो राष्ट्रचेतना जागवणारा हुंकार ठरला. त्या काळी अवघ्या काही वर्षांपूर्वी फॉकलंड युद्धात ब्रिटनकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाच्या जखमेवर फुंकर घालणारा हकीम मॅराडोनाच होता. अर्जेटिनामध्ये त्याला कोणीही मॅराडोना म्हणत नाही. ‘एल दिएगो’ म्हटले तरी तिथे पुरेसे ठरते. पेले यांच्यानंतर लॅटिन अमेरिकी परंपरा आणि प्रतिष्ठा जपणारा तो सेनानी होता. तो सामान्य वकुबाचा माणूस होता, पण असामान्य बुद्धिमत्ता आणि कौशल्य लाभलेला फुटबॉलपटू होता. त्याने यापेक्षा वेगळा दावा कधीही केला नाही. या प्रामाणिकपणासाठी त्याला दाद द्यावी लागेल. नियतीने भलेही अंमळ लवकरच त्याचा जीवनप्रवास संपल्याची शिट्टी वाजवली, तरी फुटबॉल मैदाने पावन करून आणि फुटबॉल रसिकांना कृतकृत्य करून मॅराडोनाने खंडीभर पुण्य नक्कीच जोडले.

siddharth.khandekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:28 am

Web Title: tributes to a legend diego maradona mppg 94
Next Stories
1 प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम लांबणीवर
2 डाव मांडियेला : सांकेतिक बोली
3 ‘दिल्ली कॅपिटल्स’चा खेळाडू ऑस्ट्रेलियात करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X