भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने एनआयएस येथे झालेल्या निवड चाचणीनंतर तिहेरी उडीपटू मयुखा जॉनी आणि रणजित महेश्वरी यांना हिरवा कंदील दिला आहे. रणजितने सहा संधींपैकी पाचव्या संधीत १६.६१ मी. अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. तिने अखेरच्या तीन संधींमध्ये १६मीटरचा टप्पा ओलांडला. मयुखाने १३.५६ मी. अशी सर्वोत्तम कामगिरी साकारली. दरम्यान, अंतिम चाचणीमध्ये अपेक्षित कामगिरी करू न शकणाऱ्या ४ बाय ४०० मी. पुरुषांच्या संघाला मात्र इन्चॉनसाठी पात्र ठरता आले नाही. या रिले संघात के. जे. अरुण, कुन्हू मोहम्मद, जिबिन सॅबेस्टियन आणि राजीव अरोक्या यांचा समावेश होता. या चमूने ३ मिनिटे आणि ०७.०५ सेकंद अशी वेळ नोंदवली. यापैकी कुन्हू आणि अरोक्या पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी पात्र ठरले आहेत.